वक्फ बोर्डावर दाऊदच्या माणसांची नियुक्ती; फडणवीस यांचा विधानसभेत दुसरा पेनड्राईव्ह बॉम्ब | पुढारी

वक्फ बोर्डावर दाऊदच्या माणसांची नियुक्ती; फडणवीस यांचा विधानसभेत दुसरा पेनड्राईव्ह बॉम्ब

मुंबई : अल्पसंख्याक विकास खात्याच्या अखत्यारीतील वक्फ मंडळावर कुख्यात देशद्रोही डॉन दाऊद इब्राहिमशी संबंध असलेल्या दोन व्यक्तींची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आल्याचा खळबळजनक आरोप करत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी विधानसभेत दुसरा पेनड्राईव्ह बॉम्ब टाकला. अशा नियुक्त्या करण्यासाठी राज्य सरकारला दाऊदशी संबंधित माणसेच का लागतात? आणि सरकार त्यांना पाठीशी का घालते? असे सवाल करत फडणवीस यांनी वक्फ मंडळाचे सदस्य डॉ. मुदस्सिर लांबे आणि सध्या अटकेत असलेला महम्मद अर्शद खान यांच्यातील संभाषणाचा पेनड्राईव्ह मंगळवारी सभागृहात सादर केला. 

हा पेनड्राईव्ह फडणवीस यांनी तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांच्यकडे सुपूर्द केला. मात्र, डॉ. मुदस्सिर लांबे यांची वक्फ बोर्डावरील नियुक्ती ही महाराष्ट्र विकास आघाडी सरकारच्या नव्हे, तर फडणवीस सरकारच्याच काळात झाल्याचे ट्विट करीत अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक यांच्या कन्या सना मलिक शेख यांनी हा बॉम्ब निष्प्रभ करण्याचा प्रयत्न केला.

फडणवीस यांनी सभागृहात डॉ. लांबे आणि खान यांच्यातील संभाषण वाचून दाखवले. त्यात लांबे खान यांना उद्देशून, तू आता वक्फचे काम पाहा. कारण, आपल्याकडे सत्ता आहे. आता तू हवा तेवढा पैसा कमावू शकतोस. सगळी वक्फची कामे सुरू करून कमाईचे गणित बसव. अर्धा हिस्सा तुझा आणि अर्धा हिस्सा माझा, असा हा संवाद आहे. तुम्ही गुन्हेगारांशी संबंधित व्यक्तींना पाठीशी घालणार असाल, तर यातून महाराष्ट्राचे भले होणार नाही, असे बजावत फडणवीस यांनी सरकारला जागे होण्याचा इशारा दिला.

मंगळवारी विधानसभेत नव्या अर्थसंकल्पावरील सर्वसाधारण चर्चेची सुरुवात करताना फडणवीस यांनी आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपावरून अटकेत असलेले मंत्री नवाब मलिक यांच्यावर निशाणा साधला. मलिक यांच्या सूचनेवरूनच सरकारने डॉ. मुदस्सिर लांबे यांना वक्फ बोर्डाचे सदस्य नेमल्याचा आरोप करत फडणवीस यांनी डॉ. लांबे आणि खान यांचे मोबाईलवरील संभाषण सभागृहात वाचून दाखवले. या संभाषणात दाऊद इब्राहिम, त्याची बहीण हसीना पारकर यांचा उल्लेख आहे.

या संभाषणात डॉ. लांबे हे आपला विस्तृत परिचय देतात. माझे सासरे दाऊदचे उजवे हात आहेत आणि माझे लग्न हे हसीना आपाने जमवले होते. हसीना आपा म्हणजे दाऊची बहीण आणि सोबत इक्बाल कासकरची पत्नी म्हणजे दाऊदची वहिनी. जरादेखील काही झाले तर गोष्ट तिथपर्यंत म्हणजे कराचीपर्यंत पोहोचते, असे वक्फ बोर्डाचे सदस्य असलेले डॉ. लांबे या संभाषणात सांगतात. अर्शद खान सध्या ठाणे पोलिसांच्या ताब्यात आहे. त्यामुळे मोबाईलदेखील त्यांच्या ताब्यात आहे. त्यामुळे हे संभाषण डिलीट होऊ देऊ नका, पोलिसांना लगेच कळवा आणि तो मोबाईल जप्त करा, अशी मागणी फडणवीस यांनी केली.

डॉ. लांबे हे निवडणुकीद्वारे निवडून आलेले सदस्य : वळसे-पाटील

वक्फ मंडळावर डॉ. मुदस्सिर लांबे यांची नियुक्ती आमच्या सरकारने केलेली नाही. ते निवडणुकीद्वारे निवडून आलेले सदस्य आहेत, असा खुलासा गृहमंत्री दिलीप-वळसे पाटील यांनी यावेळी केला. आता त्यांच्या नेमणुकीबाबत राज्य सरकार तपासून योग्य तो निर्णय घेईल, असेही त्यांनी सभागृहाला सांगितले.

डॉ. लांबेंची नियुक्ती भाजप सरकारकडूनच : सना मलिक

अर्धसत्य पूर्ण असत्य! असे शीर्षक देऊन नवाब मलिक यांच्या कन्या सना मलिक शेख यांनी ट्विट करत सांगितले की, डॉ. मुदस्सिर निसार लांबे यांची वक्फ बोर्डावर सदस्य म्हणून नियुक्ती देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्याच काळात 13 सप्टेंबर 2019 रोजी झाली. महाविकास आघाडीचे सरकार नोव्हेंबर 2019 ला सत्तेवर आले. माझ्या वडिलांकडे अल्पसंख्याक विकास आणि वक्फ खात्याचा कारभार 2020 च्या जानेवारीत पहिल्या आठवड्यात आला. या ट्विटमध्ये देवेंद्र फडणवीस हे डी गँगचे नातेवाईक आणि बलात्काराचा आरोपी डॉ. लांबेंसोबत असल्याचे छायाचित्रही सना मलिक यांनी जोडले आहे.

काय आहे संभाषण?

फडणवीस यांनी सादर केलेल्या पेनड्राईव्हमधील संभाषणात दोन पात्रे आहेत. एक मो. अर्शद खान आणि दुसरे आहेत डॉ. मुद्दस्सिर लांबे.
संवाद असा आहे…

सलामवालेकूम!

डॉ. लांबे : मेरा प्रॉब्लेम क्या है मालूम… मेरे ससूर दाऊद कें राईट हँड थे. पहले और मेरा रिश्ता जो हसीना आपा ने कराई थी. मेरे तरफ से सोहेल भाई थे और वहाँ सें हसीना आपा थी. हसीना आपा याने दाऊद की बहन. हसीना आपा और साथ में इक्बाल कासकर की वाईफ. याने दाऊद की भाभी. जरा भी कुछ हुआ तो बात वहाँ तक पहुँचती है.

अर्शद खान : तुमने उनके साथ अन्वर का नाम तो सुना होगा. वो मेरे चाचा है. वो भी उनके साथ ही रहते थे. मतलब स्टार्ट सें रहते थे. अभी इंतकाल हुआ उनका.

डॉ. लांबे : मेरा ससूर पुरा कोकण बेल्ट संभालते थे, ब्लॅक बेल्ट थे और पुरा वहीं संभालते.

अर्शद खान : अच्छा. बॉम्बे में मेरे चाचा थे और पुरा संभालते थे. जब मै मदनपुरा में था. भेंडी बाजार में मेरी पैदाईश है.

डॉ. लांबे : मेरे घर में कोई मसला होता है तो वहाँ तक पहुँचता है. सिधी बात सोहेल भाई तक पहुँचती है. अभी चार-पाच दिन सें मेरे घर में मसला चल रहा है. लगता है की, अपनी आप की जान देने जैसा है.

अर्शद खान : इसलिए मैने पुछा सही सही तेरी कहानी क्या, तो बोली कुछ नहीं मेरा अपना टेंशन है.

डॉ. लांबे : अर्शद मै तो बोलता हुँ की, तुम अभी तुम अभी वक्फ के काम पकडो. अभी अपने पास पॉवर है. अभी तुम चाहे जितना पैसा कमा सकते हो. पुरे वक्फ के काम शुरू करो. कमाने का सेटिंग करो. तुम्हारा आधा और मेरा आधा.

अर्शद खान : अभी मै बैठुंगा और तुमसे पर्सनली ये सब चीज में बैठुंगा. अपना एक बंदा ले के आऊंगा और काम पकडुंगा.
डॉ. लांबे : मेरे माहीम में कैसा होता मालूम है क्या, मेरे साथ क्या हुआ तो पुरे लोग साथ में आते है.

अर्शद खान : अर्शद के नाम सें बिल्डिंग ले. अर्शद मेरा भरोसे का आदमी है. कई पलटी नहीं मारेगा.

डॉ. लांबे : तुम्हारे उपर इनक्वायरी बैठ सकती है, लेकिन मेरे पर नहीं बैठ सकती.

हे संभाषण वाचून दाखवत फडणवीस म्हणाले, दाऊदची माणसे सरकारमध्ये कशी बसली आहेत ते बघा. ज्यांनी बॉम्ब स्फोट घडविले, निरपराध माणसे मारली गेली त्यामुळे आता तरी सावध व्हा!

Back to top button