पुढारी ऑनलाईन डेस्क : कोरोनाचे सरलेले संकट आणि पूर्वपदावर आलेल्या अर्थव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवारांनी आज राज्याचा सन 2022-23 चा अर्थसंकल्प सादर करत आहेत. या अर्थसंकल्पात ते कोणत्या नव्या घोषणा करतात, याबाबत उत्सुकता होती.
अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर करताना कृषीकडे अधिक लक्ष केंद्रित केल्याचे दिसून येते. दरम्यान, राज्यातील जलमार्गांसाठी ३३० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. दरम्यान, अर्थसंकल्प मांडताना अजित पवार यांनी भाऊचा धक्का ते बेलापूर वॉटर टॅक्सी दर कमी करण्याचे सुतोवाच केले आहेत.
स्पीड बोटीचे तिकिट हे प्रति प्रवासी 800 ते 1200 रूपये असून कॅटामरान बोटीचे तिकिट प्रति प्रवासी रुपये 290 रूपये आहे. या बोटी बेलापूर मधून प्रवास सुरू करून भाऊच्या धक्क्या बरोबर एलिफंटा, जेएनपीटी या मार्गावर जातील. तिकिट दर अधिक असल्याने ते कमी करण्याची मागणी होत होती. त्यामुळे अजित पवार यांनी त्याची दखल घेऊन तिकिट दर कमी करण्याचे सुतोवाच केले आहेत.
मुंबई ते बेलापूर या वॉटर टॅक्सीचा शुभारंभ आज झाला आहे. महाराष्ट्र मेरिटाईम बोर्ड आणि मुंबई पोर्ट ट्रस्ट यांची योजना असलेल्या वॉटर टॅक्सीचे लोकार्पण झाले आहे.
बेलापूर मधून 10 ते 30 इतकी प्रवासी क्षमता असलेली 7 स्पीडबोट तसेच 56 प्रवासी क्षमता असलेली कॅटामरान बोट सेवा देणार आहे. एकूण 8 अशा बोटी आहेत. या बोटीतून बेलापूर येथून दक्षिण मुंबईत भाऊचा धक्का या ठिकाणी जाण्यास फक्त 30 मिनिटे लागतात. आणि कॅटामरान या बोटीने प्रवास करण्यास 40 ते 50 मिनिटे लागतील.
हे ही वाचलं का ?