नाना पटोले म्हणाले, देवेंद्र फडणवीस नटसम्राट

नाना पटोले म्हणाले, देवेंद्र फडणवीस नटसम्राट

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : देवेंद्र फडणवीस हे नटसम्राट आहेत. त्यांना एखादे नाट्य कसे रचायचे हे चांगले ठाऊक आहे. त्यानुसार त्यांनी सभागृहात पेनड्राईव्ह आणि व्हिडीओ क्लिप सादर करीत महाविकास आघाडी सरकारवर कटकारस्थान करण्याचे नाट्य रचले, असे प्रत्युत्तर काँगेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी फडणवीस यांना दिले. विरोधकांच्या विरोधात षड्यंत्र रचण्याची सुरुवात ही फडणवीस मुख्यमंत्री झाल्यावर सुरू झाली, असा आरोपही पटोले यांनी केला.

देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत स्टिंग ऑपरेशनच्या क्लिप सादर करीत सत्ताधारी विरोधकांना संपविण्याचे कारस्थान रचत असल्याचा आरोप केला. त्यानंतर बोलताना पटोले म्हणाले, पोलीस अधिकार्‍यांचा राजकीय फायद्यासाठी वापर करून विरोधी पक्षाच्या लोकांवर कारवाई करण्याचे पाप देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात सुरू झाले. वरिष्ठ पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांना हाताशी धरून राजकीय नेत्यांचे बेकायदेशीर फोन टॅपिंग केले हे सिद्ध झाले असून त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. परंतु त्यांना टॅपिंगचे कुणी आदेश दिले होते हे उघड होण्यासाठी चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी पटोले यांनी केली.

फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकार पोलिसांचा वापर करत असल्याचा आरोप केला; परंतु माझ्यासह अनेक राजकीय नेत्यांचे बेकायदेशीर फोन टॅपिंग करण्याचे काम कोणत्या सरकारमध्ये झाले हे स्पष्ट झाले आहे. बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध ठेवणे चुकीचे आहे, इक्बाल मिर्ची या बॉम्बस्फोटातील आरोपीची देणगी कोणत्या पक्षाला मिळाली? ज्याचा बॉम्बस्फोटात सहभाग होता त्याचा पैसा कसा चालतो? त्याची चौकशी झाली पाहिजे व ज्या पक्षाने तो पैसे वापरला त्यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे, असे पटोले म्हणाले.

सभागृहात निवेदन करणार : वळसे-पाटील

दरम्यान फडणवीस यांच्या आरोपांच्या मुद्द्यावर गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी आपण या क्लिप पाहिलेल्या नाहीत. त्याची सत्यता तपासून त्यावर बुधवारी सभागृहात निवेदन करू, असे सांगितले, तर गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांनीही या व्हिडीओ क्लिपची सत्यता पडताळावी लागेल. त्यावर गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील हेच सभागृहात उत्तर देतील असे स्पष्ट केले.

पेगाससदेखील इतके करणार नाही : भुजबळ

मुंबई : अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी फडणवीसांचे आरोप फेटाळून लावले आहेत. शरद पवार कुणाबाबत असे भाष्य करणे शक्य नाही, असे ते म्हणाले. 130 तासांचे व्हिडीओ काढले आहेत तर हे सर्व तपासले जाईल. त्यातून सत्य काय ते बाहेर येईलच. पेगासस देखील एवढे करणार नाही. एक-दोन तास ठीक आहे; पण एवढे तास जे वकील सांगत आहेत ते खरे आहे कशावरून? असा संशयही भुजबळ यांनी व्यक्त केला. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी या व्हिडीओ क्लिपची सत्यता पडताळून पाहायला लागेल. त्यानंतर या विषयावर बोलणे योग्य होईल, असे त्यांनी सांगितले.

ती भेट खासगी केसबाबत

माजी अनिल गोटे यांनीही त्यांच्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत. देवेंद्र फडणवीस, माझे नाव घेतले याबाबत मी त्यांचा आभारी आहे. याशिवाय मला त्यांच्याबद्दल बोलताच आले नसते. आम्ही कुणाला अडकवण्यासाठी तिथे बसलो होतो असे फडणवीस यांनी म्हटले आहे. माझ्या एका केसबाबत मी तिथे बसलो होतो.

चव्हाण नावाचे वकील आहेत, ते धुळ्याला सातत्याने येत होते. त्यामुळे त्यांना भेट घ्यायला गेलो होतो. पण देवेंद्र फडणवीस यांना एवढी काय पडली होती की त्यांनी तेथे जाऊन शूटिंग करायला लावले? असा सवाल गोटे यांनी केला. कुणी खासगीतही बोलू नये असे धोरण आहे का? आम्ही आमच्या बायकांशीही बोलायचं नाही का? असे ते म्हणाले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news