मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : दिशा सालियन बदनामीप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांचे पुत्र आमदार नितेश राणे यांची शनिवारी मालवणी पोलिसांकडून 9 तास मॅरेथॉन चौकशी करण्यात आली. दुपारी पावणेदोन वाजता सुरू झालेली ही चौकशी रात्री पावणेअकरापर्यंत चालली. दरम्यान नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.
दरम्यान, कित्येक तास झाल्यानंतरही पोलिसांची चौकशी सुरूच होती. अखेरीस केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना फोन केल्यानंतर पोलिसांनी आम्हाला सोडले, असा दावा नारायण राणे यांनी माध्यमांशी बोलताना केला.
रात्री उशिरापर्यंत विविध प्रश्नांची सरबत्ती करत पोलिसांनी राणे पिता-पुत्रांचा जबाब नोंदवला. काही तास या दोघांना समोरासमोर बसवून चौकशी झाली, तर काही वेळानंतर त्यांची स्वतंत्र चौकशी झाल्याचे सांगण्यात आले.
राणे पिता-पुत्रांचे मालवणी पोलिस ठाण्यात आगमन झाले तेव्हा परिसरात भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमले होते. त्यांच्या हाती भाजपचे झेंडे होते. या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केल्यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला. राणे समर्थक आणि पोलिसांत शाब्दिक बाचाबाचीदेखील झाली.
दिशा सालियनच्या आत्महत्येनंतर तिच्याविषयी आक्षेपार्ह आणि वादग्रस्त विधान केल्यामुळे नारायण राणे आणि नितेश राणे यांच्याविरुद्ध मालवणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर त्यांना समन्स पाठविण्यात आले होते.
दोघे पिता-पुत्र शनिवारी दुपारी दीड वाजता मालवणी पोलिस ठाण्यात चौकशीसाठी हजर झाले व पावणेदोनला चौकशी सुरू झाली. दिशा सालियन आत्महत्येनंतर राणे पिता-पुत्रांकडून सतत वादग्रस्त विधाने करण्यात आली होती. त्यात दिशावर बलात्कार झाला होता. बलात्कारानंतर तिची हत्या झाली होती.
दिशा गरोदर होती. दिशा आणि सिनेअभिनेता सुशांतसिंग राजपूत यांच्या आत्महत्येमागे काही राजकीय नेत्यांचा सहभाग आहे, आत्महत्येच्या वेळेस दिशा नग्न अवस्थेत होती. तिच्या शवविच्छेदन अहवालात फेरफार झाला, असे अनेक गंभीर आणि आक्षेपार्ह आरोप नारायण राणे यांनी केले होते. एकूणच मालवणी पोलिसांच्या तपासावर राणे पिता-पुत्रांनी आक्षेप नोंदवून सोशल मीडियावर संबंधित प्रकरण सतत चर्चेत ठेवले. त्यामुळे त्यांच्या मागे ही चौकशी लागली.
अभिनेता सुशांतसिंग राजपूत आणि दिशा सालियानच्या मृत्यूनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्याला दोनवेळा फोन केला. या परिसरात मंत्र्याची गाडी होती हे बोलू नका, असे सांगितल्याचा दावा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी माध्यमांशी बोलताना केला.
राणे म्हणाले, सुशांतच्या केसबद्दल आणि संबंधित ठिकाणी एका मंत्र्याची गाडी होती य बद्दल कोठे बोलू नका. तुम्हालाही मुले आहेत, असे मुख्यमंत्री ठाकरे फोनवर म्हणाले होते. मी हे पोलिसांना वारंवार सांगितले, पण त्यांनी माझ्या जबाबातून ही वाक्ये वगळली.
आपण पत्रकार परिषदेत बोललो होतो की, दिशाचे खरे आरोपी पकडले गेले पाहिजेत. तिने आत्महत्या केली नसून, ती हत्या आहे. यानंतर दिशाच्या आईकडे मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर गेल्या आणि त्यांना तक्रार करायला प्रवृत्त केले, असे नारायण राणे म्हणाले.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या विधानावर काय बोलावे, हेच कळत नाही. दाऊद आमचा मित्र नाही. तो देशद्रोही आहे. त्याने देशात बॉम्बस्फोट घडवले. त्यात निष्पाप नागरिक मारले गेले. त्या दाऊदशी तुमच्या पक्षातल्या नवाब मलिक यांचे संबंध आहेत. म्हणून आम्ही त्यांचा राजीनामा मागत आहोत. मला पोलिसांनी अटक केली असली तरी माझा दाऊदशी संबंध नाही.
– नारायण राणे, केंद्रीय मंत्री