पुढारी ऑनलाईन डेस्क : प्रामाणिकपणे लोकांसमोर जाऊन लोकांनी सत्ता दिली तर तुम्ही राज्य करा. पण सगळे मलाच हवे आणि सत्तेचा दुरुपयोग करून सत्ता मिळवीनच हा प्रकार देशाच्या राजकारणात यापूर्वी कधी नव्हता. अशा प्रवृत्तीने देशाचे राजकारण नासवून टाकले आहे. विकृत करून टाकले आहे. त्यातूनच आज देशात राज्य आणि केंद्रामध्ये संघर्ष सुरू झाला आहे, अशी टीका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी केली.
अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांना ईडीने अटक केल्यानंतर महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये संघर्ष वाढला आहे. या कारवाईवरून वातावरण तापले असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. मुंबईत एका वर्तमानपत्राच्या कार्यक्रमात बोलताना उद्धव ठाकरे यांनी भाजपवर टीकास्त्र सोडत मौन सोडले.
ते म्हणाले, केंद्रात बसलोय म्हणून राज्याची मुस्कटदाबी करायची या प्रवृत्तीचा सगळ्यांनी निषेध करायला हवा. सत्ता कुणाला नको असते? रशिया-युक्रेनमध्ये सद्या युद्ध सुरू आहे. आपल्या लोकशाहीवरही सतत आक्रमण सुरू आहे. गुजरातमध्ये मोठा घोटाळा बाहेर पडला. आपल्याकडे चिमूटभर सापडले तर केवढा गहजब केला जातो. जणू काही तुळशी वृंदावनाची संस्कृती सोडून गांजाची शेती होतेय असे चित्र उभे करायचे आणि महाराष्ट्राला बदनाम करायचे हे षडयंत्र सुरू आहे. महाराष्ट्र जणूकाही देशातला सगळ्यात सडका भाग आहे अशा पद्धतीने राजकारण चालले आहे. धाडीमागू धाडी सुरू आहेत, असा संताप उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. त्याचवेळी प्रत्येकाचे दिवस असतात आणि दिवस बदलतात, असा इशाराही त्यांनी भाजपला दिला.
राज्यात करोना काळात केलेल्या कामाचे कौतुक सर्वोच्च न्यायालयाने देखील कौतुक केले आहे. आता त्यातही भ्रष्टाचाराचे आरोप केले जात आहेत. हे दुर्दैवी असल्याचे सांगत शोधा काय शोधायचे ते असे आव्हान उद्धव ठाकरे यांनी भाजपला दिले.
हे ही वाचा