राऊत-सोमय्यांची आरोप-प्रत्यारोपाची तोंडपाटीलकी रोखा ! उच्च न्यायालयात याचिका दाखल

राऊत-सोमय्यांची आरोप-प्रत्यारोपाची तोंडपाटीलकी रोखा ! उच्च न्यायालयात याचिका दाखल

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा  शिवसेना नेते संजय राऊत आणि भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्यात सुरू असलेली आरोप-प्रत्यारोपाची तोंडपाटीलकी रोखण्याचे आणि ज्यांच्यावर घोटाळ्याचे आरोप आहेत, त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करून चौकशीचे आदेश देण्याची विनंती करणारी एक जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. पुण्याचे सामाजिक कार्यकर्ते भारत अगेन्स्ट करप्शनचे अध्यक्ष हेमंत पाटील यांनी दाखल केलेल्या या याचिकेवर लवकरच सुनावणी होण्याची शक्यता आहे.

भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांवर तसेच राजकीय नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. त्यामध्ये कोव्हिड सेंटरमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करतानाच त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर केलेल्या विविध गंभीर आरोपांचा समावेश आहे. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी गडहिंग्लज सहकारी साखर कारखान्याची 100 कोटींची फसवणूक केल्याचा आरोपही सोमय्या यांनी केला होता. हे संदर्भ याचिकेत देण्यात आले आहेत.

आघाडी सरकारमधील नेत्यांवर आरोप करणार्‍या किरीट सोमय्या यांना प्रत्युत्तर देताना शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनीही पत्रकार परिषद घेऊन सोमय्या यांच्या आरोपांचे खंडन करतानाच सोमय्या आणि त्यांचा मुलगा नील सोमय्या यांच्या विरोधात भ्रष्टाचाराचे आरोप केले. या दोघांचे पीएमसी बँक घोटाळ्यातील आरोपी राकेश वाधवान यांच्याशी संबंध असल्याचा आरोपही राऊत यांनी केला होता. तसेच भाजपतील काही नेत्यांवरही गैरव्यवहाराचे आरोप केले होते. राऊत आणि सोमय्या यांच्यामधील द्वंद्वामुळे समाजामध्ये तेढ निर्माण होऊन शांतता भंग होण्याची भीती याचिकेत व्यक्‍त करण्यात आली आहे.

दोन्ही नेते सुशिक्षित आणि संसदीय सदस्य 

हे दोन्ही नेते सुशिक्षित आणि संसदीय सदस्य आहेत/होते. त्यांना कायद्याची जाण आहे. असे असताना पत्रकार परिषदा घेऊन एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करून ते जनतेची दिशाभूल करीत आहेत. समाजातील शांतता भंग करीत आहेत. त्यामुळे समाजात तेढ निर्माण होऊन दंगल होण्याची शक्यताही नाकारता येणार नाही, असा दावाही याचिकेत केला आहे. या याचिकेवर लवकरच सुनावणी होण्याची शक्यता आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news