मुरुड कोर्लई गावात रश्मी ठाकरेंचे बंगलेच नाहीत | पुढारी

मुरुड कोर्लई गावात रश्मी ठाकरेंचे बंगलेच नाहीत

अलिबाग : पुढारी वृत्तसेवा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांचे कोर्लई येथे 19 बंगले असल्याचा आरोप कोर्लई ग्रामपंचायतीचे सरपंच प्रशांत मिसाळ यांनी खोडून काढला आहे. शिवाय रश्मी ठाकरे यांनी कधीच ग्रामपंचायतीची माफी मागितली नाही, असेही त्यांनी बुधवारी स्पष्ट केले.

भाजप नेते सोमय्या यांनी दावा केलेल्या या 19 बंगल्यांच्या अनुषंगाने कोर्लई ग्रामपंचायतीचे सरपंच प्रशांत मिसाळ यांनी सांगितले की, येथे असे बंगले अस्तित्वातच नाहीत. शिवाय त्यांनी कधीच ग्रामपंचायतीची माफीही मागितली नाही. किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरेंच्या नावावर अलिबागमध्ये कोर्लई गावात 19 बंगले असल्याचा दावा केल्यानंतर शिवसेनेचे खा. संजय राऊत यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेत हा दावा खोडून काढला.

तसेच तुम्हाला जर ते बंगले दिसले तर मी राजकारण सोडेन आणि दिसले नाही तर त्या किरीट सोमय्यांना जोड्याने मारा असे विधान संजय राऊत यांनी केले होते. त्यानंतर बुधवारी सकाळी पुन्हा किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेत ग्रामपंचातीतील कागदपत्रांचा पुरावा दिला. यामुळे खरंच हे बंगले आहेत की नाहीत असा प्रश्न सर्वांना पडला. याच पार्श्‍वभूमीवर प्रत्यक्ष कोर्लई गावांत भेट देऊन पहाणी केली असता येथे कोणत्याही प्रकारचे बंगले नसल्याचे स्पष्ट झाल्याने सोमय्या यांचे आरोप बिनबुडाचे ठरले आहेत.

दरम्यान कोर्लई येथे रश्मी ठाकरे आणि मनिषा वायकर यांच्या नावे साडे नऊ एकर जमीन आहे. या जमिनीवर 19 बंगले असल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. या जागेची देखील प्रत्यक्ष पाहणी केली असता या जागेवर देखील बंगले नसल्याचे समोर आले आहे. या जागेत नारळीची झाडे, गुरांचा गोठा, पंप शेड, विहीर, पाण्याच्या टाक्या, साठवण तलाव असल्याचे दिसून आले.
प्रस्तूत जागेवर रिसॉर्ट बांधण्यासाठी अन्वय नाईक यांनी 2009 मध्ये कोर्लई ग्रामपंचायतीकडे परवानगी मागितली होती.

2009 मध्ये घराची कच्ची जोती बांधली. मात्र, नंतर त्यांना रिसॉर्टची परवानगी मिळाली नाही. त्या जागेवर 11-12 घरे होती ती तोडून तेथे झाडे लावली. झाडे लावल्यानंतर 2014 मध्ये त्यांनी ही जागा रश्मी ठाकरे आणि मनिषा वायकर यांना रितसर विक्री केली. त्यानंतर 2015 ते 2019 या काळात त्यांच्यापैकी कुणीही इथे आले नाही. 2019 मध्ये आम्ही वायकर यांना, खरेदी करताना दिलेल्या पत्त्यावर ग्रामपंचायतीने रितसर नोटीस पाठवली की 2014 ते 2019 पर्यंतची घरपट्टीची थकबाकी भरावी. त्यानंतर त्यांनी 2019 ला ही सर्व घरपट्टी बँक आरटीजीएसने ग्रामपंचायतीकडे भरणा केली असल्याची माहिती कोर्लई सरपंच प्रशांत मिसाळ यांनी दिली आहे.

Back to top button