

अमरावती : कौटुंबिक विश्वासाला तडा देणारी एक अत्यंत धक्कादायक घटना वरुड तालुक्यात उघडकीस आली आहे. येथे एका १७ वर्षीय मुलाने आपल्याच नात्यातील अल्पवयीन मामेबहिणीचे लैंगिक शोषण केल्याचे समोर आले आहे. पोटदुखीच्या त्रासामुळे हा प्रकार उघडकीस आला असून, पीडित मुलगी गर्भवती असल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी पीडितेच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून वरुड पोलिसांनी अल्पवयीन आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलीचे पालक गावोगावी फिरून फुगे विकण्याचा व्यवसाय करतात. उदरनिर्वाहासाठी ते गेल्या वर्षभरापासून वरुड येथील आपल्या नातेवाईकांकडे, म्हणजेच पीडितेच्या मामाच्या घरी वास्तव्यास होते. याच काळात पीडित मुलगी आणि तिच्या १७ वर्षीय मामेभावामध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. पीडितेचे आई-वडील फुगे विकण्यासाठी घराबाहेर जात असत. याच संधीचा गैरफायदा घेत आरोपी मुलगा तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करत असे. हा प्रकार गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू होता.
काही दिवसांपूर्वी पीडित मुलीच्या पोटात तीव्र वेदना होऊ लागल्या. त्यामुळे तिच्या आईने तिला उपचारासाठी तातडीने स्थानिक रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तिची वैद्यकीय तपासणी केली असता, ती गर्भवती असल्याची धक्कादायक माहिती समोर आली. हादरलेल्या आईने विश्वासाने मुलीला विचारपूस केली असता, तिने घडलेला सर्व प्रकार सांगितला. यानंतर, २५ जुलै रोजी पीडितेच्या आईने वरुड पोलीस ठाण्यात धाव घेऊन आरोपी मुलाविरुद्ध तक्रार दाखल केली.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने १७ वर्षीय आरोपी मुलाविरुद्ध भारतीय दंड विधान आणि बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये (पोक्सो) गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून, नात्यातील व्यक्तीकडूनच झालेल्या या कृत्यामुळे तीव्र संताप व्यक्त होत आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, कौटुंबिक विश्वासाला काळिमा फासणाऱ्या या घटनेने सामाजिक सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आणला आहे.