मुंबई; पुढारी वृत्तसेवा: मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (एमसीए) वानखेडे स्टेडियमवर होणाऱ्या संग्रहालयाला एमसीएचे माजी अध्यक्ष शरद पवार यांचे नाव देण्यात येणार आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या शीर्ष परिषदेच्या बैठकीत शुक्रवारी रोजी याबाबत निर्णय घेण्यात आला. एमसीए अध्यक्ष विजय पाटील यांनी बैठकीत शरद पवार यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला आणि या प्रस्तावाला शीर्ष परिषद सदस्यांनी एकमताने पाठिंबा दिला. यानंतर शरद पवार यांचे नाव देण्याचे निश्चित करण्यात आले.
२००१ ते २०१३ या कालावधीत शरद पवार यांनी एमसीएची धुरा सांभाळली होती. यादरम्यान ते भारतीय क्रिकेट नियामक मंडळ ( बीसीसीआय) आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (आयसीसी) देखील अध्यक्ष होते. शरद पवार यांचे नाव संग्रहालयाने देणे ही एमसीएसाठी अभिमानाची गोष्ट आहे. त्यांनी मुंबई क्रिकेटची प्रतिष्ठा देशासह आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवली आहे. क्रिकेटबद्दलचे त्यांचे योगदान आणि उत्कटता कौतुकास्पद असल्याचे विजय पाटील 'दै. पुढारी' शी बोलताना सांगितले.
तसेच शरद पवार यांनी विविध पेन्शन योजना सुरू केल्या आहेत. आणि गरजू मुलांना शिष्यवृत्तीही दिल्या आहेत. असे एमसीएच्या शीर्ष परिषदेच्या सदस्याने दै. पुढारीशी बोलताना सांगितले.
हेही वाचलंत का?