Darwin Day : निसर्गातील अस्‍तित्‍वाच्‍या लढाईचा ‘नियम’ सांगणारा महान शास्‍त्रज्ञ सर चार्ल्स डार्विन | पुढारी

Darwin Day : निसर्गातील अस्‍तित्‍वाच्‍या लढाईचा 'नियम' सांगणारा महान शास्‍त्रज्ञ सर चार्ल्स डार्विन

अमोल लोखंडे : पुढारी ऑनलाईन

एक चर्चा आपण नेहमी ऐकतो  माणसाची उत्पत्ती ही माकडापासून झालीय. या बाबतीत बरीच मतमतांतरेसुद्धा आपण ऐकतो. विज्ञान किंवा शास्त्र या विषयाशी संबंधित नसलेला मोठा वर्ग माणसाच्या उत्पत्तीच्या या सिद्धांताशी सहमत नाहीये. जीवांची किंवा एकूणच पृथ्वीची उत्पत्ती, माणसाची उत्क्रांती, पहिला मानव, प्राचीन मानव, प्रागैतिहासिक मानव, अश्मयुगीन मानव, आजचा प्रगत मानव, त्याने केलेली विज्ञानातील प्रगती, मग विज्ञान म्हणजे काय, जीवशास्त्र, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित, भूगोल, इतिहास असे कित्येक विषय जे या पृथ्वीच्या अस्तित्वाचा अनेक अंगांनी अभ्यास करतात हे सगळं सध्याच्या मानवी समाजरचनेतल्या सर्व विचारप्रवाहांना मान्य असेल असं नाही. ( Darwin Day )

प्राचीन मानव हा निसर्गनियमांचं पालन करून राहत होता. त्याच्याही गरजा आहार, निद्रा, भय आणि मैथुन याच होत्या. त्यामुळं भूक लागली की कंदमुळं, फळं खाऊन किंवा लहानमोठ्या प्राण्यांची शिकार करून आपली भूक भागवायचा. एखाद्या गुहेत सुरक्षित निवारा शोधून विश्रांती घ्यायचा. त्यालाही जीवाची भीती होतीच. त्याच्या सगळ्या गरजा या निसर्गच पूर्ण करायचा त्यामुळं तो आपल्यापेक्षा जास्त कणखर होता. ऊन, वारा, पाऊस यांचा तो सहज सामना करायचा. आज जर आपण काही दिवस त्याच्यासारखं निसर्गात जाऊन जगायचं ठरवलं तर ते शक्य होईल का? पायात चप्पल नसेल तर आपण घरासमोरचा रस्ता दहा पावलंही चालू शकत नाही. तसं आता जंगल भटकंती, कॅम्प वगैरे प्रकार आजची पिढी सर्रास करताना दिसते. तंबू घेऊन, खाण्यापिण्याचं साहित्य, शिधा घेऊन कार किंवा मोटरसायकलने वीकएंडला एखाद्या जंगलात जाऊन राहणाऱ्यांची संख्या आता वाढलीय. पण आदिमानव जिकडे अन्न मिळेल तिकडे तो स्थलांतर करत राहिला. त्याच्या मेंदूचा जसजसा विकास होत गेला तसतसा तो प्रगत होत गेला. आधी दोन चार जणांच्या संख्येने राहणारा तो आता टोळी करून राहू लागला, शेती करू लागला, हद्द ठरवू लागला, एखाद्या जागेवर हक्क प्रस्थापित करणं सुरू झालं, त्यातून मग टोळीयुद्धं सुरू झाली. हळूहळू सामाजिक भावना निर्माण होऊ लागल्या, सामाजिक नियम बनवणं सुरू झालं. माणूस जो आधी निसर्गाचा घटक होता तो स्वत:ला त्यापासून वेगळं समजू लागला.

वसाहती निर्माण झाल्या. संस्कृती निर्माण झाल्या. प्रांत, भाषा, आचरण पद्धती विकसित होऊ लागल्या. नव्या गरजा निर्माण होऊ लागल्या आणि त्या पूर्ण करण्यासाठी माणसाने वेगवेगळे शोध लावले. शारीरिक श्रम कमी व्हावेत म्हणून तंत्रज्ञानात प्रगती झाली. गेल्या दहा वर्षातल्या तंत्रज्ञानातल्या प्रगतीबद्दल तर काय बोलावं! आता प्रत्येक गोष्ट ऑनलाइन झालीय. रोजच्या वापरातल्या कितीतरी गोष्टी आपण फक्त वॉइस कमांड देऊन साध्य करू शकतो. हळूहळू माणूस एका अर्थी परावलंबी होतोय. ही झाली मानवजातीची उत्क्रांती. यालाच समांतर निसर्गसुद्धा उत्क्रांत होतोच आहे.

उत्क्रांतीवाद ही संकल्पना नेमकी काय आहे? ‘उत्क्रांतीवाद’ म्हटलं की पहिलं किंवा आपल्यापैकी बऱ्याच जणांसाठी कदाचित एकमेव नाव डोळ्यांसमोर येतं ते म्हणजे डार्विन. सर चार्ल्स डार्विन. किंवा असंही म्हणू शकतो की डार्विन म्हणजे उत्क्रांतीवाद. डार्विननं मांडलेले उत्क्रांतीचे सिद्धांत आपण शाळेत असताना शिकलो आहोत. यात Survival of the fittest’, ‘Natural Selection’ आणि ‘Theory of Evolution’ या काही सिद्धांतांचं आपण उदाहरण घेऊ शकतो.

जीवांच्या उत्पत्तीबाबत फक्त चार्ल्स डार्विननेच सिद्धांत मांडले असं नाही. डार्विनच्या आधी बऱ्याच तत्ववेत्त्यांनी आणि जीव अभ्यासकांनी जिवोत्पत्तीचे अनेक सिद्धांत मांडले होते. खुद्द डार्विनच्या आजोबांनी – इरॅस्मस डार्विन यांनीसुद्धा जिवोत्पत्तीचा सिद्धांत मांडला होता. परंतु, चार्ल्स डार्विन यांनी त्यांच्या प्रसिद्ध ‘ऑन द ओरिजिन ऑफ द स्पिसीज’ या पुस्तकात जो सिद्धांत मांडला तो जास्त शास्त्रीय होता आणि तोच बहूमान्य झाला. हा सिद्धांत ज्या तत्त्वांच्या आधारे मांडला त्यातलं एक तत्व म्हणजे ‘नॅचरल सिलेक्शन’. पण ही नॅचरल सिलेक्शनची थेअरी फक्त डार्विनच्या एकट्याच्या नावावर नाहीये. यात अजून एक महत्त्वाचं नाव आहे ते म्हणजे अल्फ्रेड रसेल वॉलेस. डार्विन आणि वॉलेस या दोघांनी मिळून ‘जीवांची उत्पत्ति ही नैसर्गिक निवडीच्या तत्त्वावर झालेली आहे’ असं मत मांडलं.

 Darwin Day : नैसर्गिक निवड कशाच्या आधारे ठरते?

आता हे नॅच्युरल सिलेक्शन म्हणजे नैसर्गिक निवड कशाच्या आधारे ठरते? तर त्यातला पहिला मुद्दा म्हणजे Survival ऑफ the fittest. म्हणजे जो सुदृढ आहे, सशक्त आहे तोच जगण्यासाठी लायक आहे. आणि म्हणून निसर्गात लंगडे, लुळे, व्यंग असणारे किंवा जखमी झालेले प्राणी जास्त काळ जगू शकत नाहीत. अगदी घरगुती उदाहरण देतो. मी एक कुत्री पाळलीय. तिचं नाव आहे मर्सी. या मर्सीने गेल्या महिन्यात सहा पिल्लांना जन्म दिला. सहावं पिल्लू तब्बल ४ तासांच्या गॅपनंतर जन्माला आलं. हा चार तासांचा गॅपच त्याच्या मृत्यूला कारणीभूत ठरला. कारण, कोणताही प्राणी – सस्तन प्राणी जन्माला आला की तो आधी आईचं स्तन शोधतो. तोच त्याचा पहिला टास्क किंवा त्याची जीवनातली पहिली परीक्षा असते. उशीरा जन्माला आलेल्या सहाव्या पिल्लाला आईचं दूध मिळू शकलं नाही. परिणामी, त्याच्या अंगातली ताकद कमी होत गेली. कोपऱ्यात एकटंच पडून विव्हळत होतं. आणि आईनेही त्याच्या अशक्तपणाकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केलं. कितीही ओरडलं तरी मर्सीने त्याला ना जवळ घेतलं ना त्याला दूध पाजलं. ही त्याची लढाई होती आणि त्यालाच लढायची होती म्हणून भूतदयेचा विचार बाजूला ठेवून आम्ही कुणीच त्यात interfere केलं नाही. शेवटी त्या पिल्लानं प्राण सोडला. हे एक मी आपल्या आसपासचं उदाहरण सांगितलं. निसर्गातसुद्धा असंच घडतं. निसर्गात आईला आपलं पिल्लू अशक्त आहे असं वाटलं तर ती त्याला मुद्दामहून जगवायचा प्रयत्न करत नाही. थोडा प्रयत्न करते नाही असं नाही पण परिस्थिती लक्षात आली की मुव ऑन होते. निसर्ग त्याचा नियम आपल्याला पाळायलाच लावतो. जो सदृढ आहे तोच जगणार. याला म्हणायचं Survival of the Fittest.

Darwin Day : अस्तित्वाची लढाई स्वबळावरच लढावी लागते

आता नॅचरल सिलेक्शन. निसर्गत: झालेली निवड. ही निवड करण्याचा क्रायटेरिया फार काटेकोर आणि कठोर आहे. तिथे अजिबात चीटिंग चालत नाही. तिथे बाकीचे कुणी मदतीला येत नाहीत. अस्तित्वाची ही लढाई जीवाला स्वबळावरच लढावी लागते. बरीच उदाहरणं सांगता येतील पण मी आपल्या कोल्हापूर जिल्ह्यात आढळणाऱ्या गव्यांचं उदाहरण सांगेन. गवा हा १० ते २५ च्या संख्येने कळपात राहणारा बैल कुलातला सर्वात मोठा प्राणी. संख्या कमी जास्त असू शकते. पण गव्याचा एक सुदृढ कळप म्हणजे त्यात असणाऱ्या माद्या, वासरे आणि एकच मुख्य नर. मग बाकीचे जन्मलेले नर कुठे असतात? तर हे नर वयात आले की त्यांना कळपातून बाहेर काढलं जातं. मग या बाहेर काढलेल्या नरांनी काय करायचं? तर त्यांनी जंगलात एकटं राहायचं, ताकद कमवायची, आणि मीलन काळात कळपात परत येऊन मुख्य नरासोबत लढाई करायची. जो जिंकेल त्यालाच मीलनाचा अधिकार. जो हरेल त्याने बाहेरचा रस्ता धरायचा. ही लढाई म्हणजे ताकदीची, वर्चस्वाची लढाई. स्वत:च्या बलवान असण्याचा पुरावा. साहजिकच जो बलवान आहे, सुदृढ आहे त्याच्याशी मीलन झालं की जन्माला येणारी पिल्लेसुद्धा सुदृढच असणार. त्यांच्यात कोणतंही व्यंग असणार नाही. त्यामुळे एक सशक्त पिढी जन्माला यायची तर आई-वडीलसुद्धा सुदृढ आणि सशक्तच असायला हवेत. ही सशक्ततेची निवड लढाईतून होते. सोप्या भाषेत सशक्ताचं सिलेक्शन म्हणजे नॅचरल सिलेक्शन.

आपल्या जन्माची कहाणीसुद्धा याच तत्वावर आधारलेली आहे. अभ्यास सांगतो, स्त्री ज्यावेळी जन्माला येते तेव्हा तिच्या शरीरात जवळपास दहा लाख बीजांडे असतात. जेव्हा ती वयात येते ते बीजांडांची संख्या कमी होऊन तीन लाखांवर येते. आणि जेव्हा स्त्री प्रजननक्षम बनते तेव्हा तीन लाखांतले फक्त ३०० ते ४०० च बीजांडे शिल्लक राहतात. याउलट पुरुष त्याच्या फक्त एका एजकुलेशन म्हणजे स्खलनातून सरासरी तब्बल ८० लाख ते ३०० लाख शुक्राणू सोडत असतो. म्हणजे एका समागमावेळी स्त्री फक्त एक बीजांड स्खलित करते आणि पुरुष त्यावर ८० लाख ते ३०० लाख शुक्राणू सोडतो. शुक्राणूचं काम काय असतं? तर बीजांडाला फलित करणं. गंमत म्हणजे पहिला शुक्राणू बीजांडाचं कवच फोडून त्यात शिरला की रासायनिक क्रिया घडते आणि कवच कठीण होतं ज्यामुळे नंतर एकही शुक्राणू बीजांडात शिरू शकत नाही. मग एका बीजांडासाठी ८० लाख ते ३०० लाख शुक्राणू? हीच तर जगण्याच्या प्रवासातली पहिली स्पर्धा आहे. एवढ्या प्रचंड, नव्हे महाप्रचंड स्पर्धेतून आपला नंबर लागावा म्हणून प्रत्येक शुक्राणू वेगाने बीजांडापर्यंत पोचण्याचा प्रयत्न करतो. साहजिकच जो शुक्राणू सक्षम आहे तोच ही शर्यत जिंकतो आणि बाकीचे सगळे नापास होतात. त्यातून जन्माला येणारं मूल त्या नापास झालेल्या शुक्राणूंच्या गुणसुत्रांच्या तुलनेत जास्त चांगली गुणसुत्रे घेऊन जन्माला येतं. मी मुद्दाम ‘त्या नापास झालेल्या शुक्राणूंच्या गुणसुत्रांच्या तुलनेत’ असं म्हणतोय कारण माणसांच्या बाबतीत बोलायचं तर आपण नैसर्गिक निवड कधीच बाजूला सारलीय. निसर्गात शारीरिक सुदृढता सिद्ध करावी लागते. माणसाच्या बाबतीत शारीरिक सामर्थ्य बघितलं जातंच असं नाही. त्याऐवजी, भौतिक गोष्टी जसं की सांपत्तिक, आर्थिक, कौटुंबिक स्थितीला जास्त प्राधान्य दिलं जातं. निसर्गात तसं अजिबात होत नाही. व्यंग, व्याधी, वैगुण्य असणाऱ्या प्राण्याला किंवा जीवाला निसर्गात जगण्याचा अधिकार नाही. निसर्ग फक्त आणि फक्त सुदृढ जीवालाच जगण्याची परवानगी देतो. हेच ते नॅचरल सिलेक्शन.

जीवसृष्टीतल्या घडामोडींची सूक्ष्म निरीक्षणे आणि सखोल अभ्यास यातून डार्विनने हे जीवनाच्या उत्क्रांतीचे सिद्धांत मांडले. डार्विनच्या कार्याचा गौरव म्हणून दरवर्षी १२ फेब्रुवारी हा दिवस ‘डार्विन डे’ म्हणून साजरा केला जातो. डार्विन कोण होता, त्याचा जन्म केव्हा झाला, त्याने काय केलं हे आपल्याला आजच्या प्रगत तंत्रज्ञानाच्या युगात स्क्रीनवर बोट चालवून जाणून घेणं सहज साध्य आहे. मुद्दा हा आहे की डार्विननं मांडलेल्या सिद्धांतांची प्रचिती आपल्याला आपल्या रोजच्या आयुष्यात येत असते त्याकडे आपण डोळसपणाने पाहतो का? उत्तर हो असेल तर आपल्याला आपल्या व्यक्तिगत जीवनप्रवासाचा आलेख अचूक मांडता येईल. आपली बलस्थाने, आपल्यातल्या उणिवा ओळखता येतील. जीवन ही एक नैसर्गिक स्पर्धा आहे आणि ती जिंकण्यासाठी आपल्याला कठोर परिश्रम घेऊन सक्षम आणि सुदृढ (शारीरिकच नव्हे, तर मानसिक आणि वैचारिक स्वास्थ्याच्या अनुषंगानेसुद्धा) होणं गरजेचं आहे हे समजेल. ‘डार्विन डे’च्या निमित्ताने एवढं जरी विचारमंथन आपण करू शकलो तर ती एका अर्थी डार्विनच्या कार्यकर्तृत्वाला दिलेली आदरांजली ठरेल.

 

 

Back to top button