

इस्लामाबाद : वृत्तसंस्था
प्रसिद्ध पाकिस्तानी टीव्ही होस्ट तसेच इम्रान खान यांच्या 'तहरिक-ए-इंसाफ' पक्षाचे खासदार आमिर लियाकत आता तिसरे लग्न करत आहेत. इम्रान यांनीही तीन लग्ने केली आहेत. इम्रान यांनी खासदार आमिर लियाकत यांना फोनवरून लग्नाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
आमिर यांनी दुसर्या पत्नीला (सय्यदा तुबा अनवर) बुधवारीच 'तलाक' दिला. 24 तास उलटले आणि 'बडे नाज'से (मोठ्या अभिमानाने) आमिर लियाकत यांनी आपल्या तिसर्या पत्नीचा परिचय सोशल मीडियावरून स्वत:च दिला. सय्यदा दानिया शाह ही त्यांची तिसरी बायको गुरुवारीच 18 वर्षांची झाली आहे. दानिया अजून शिकते आहे. माझ्या या लग्नावर जळणार्यांसाठी 'दुनिया जले तो जले' एवढीच प्रतिक्रिया माझ्याकडे आहे, असेही या पोस्टमध्ये त्यांनी नमूद केले आहे.
एका यूझरने आमिर यांच्यासह एका नवजात बालिकेचा फोटो टाकून 18 वर्षांपूर्वीचे हे छायाचित्र, त्यात आमिर आणि त्यांची नियोजित पत्नी दिसत आहे, अशी प्रतिक्रिया नमूद केली आहे. आमिरकडे एकच काम आहे. ते म्हणजे निकाह-तलाक, निकाह-तलाक आणि निकाह-तलाक, असेही या यूझरने म्हटले आहे.
पंतप्रधान इम्रान यांनीही तीन लग्ने केली आहेत. जेमिमा गोल्डस्मिथ, रेहम खान ही त्यांच्या 'तलाकशुदा' बायकांची नावे असून, बिबी बुशरा मेनका या त्यांच्या विद्यमान जोडीदार आहेत.