गडचिरोली, पुढारी वृत्तसेवा : आलापल्ली वनपरिक्षेत्रातील झिमेला (२) येथील राखीव जंगलातून अवैधरित्या वृक्षतोड करुन वाहतूक करणाऱ्या तस्करांकडून वनाधिकाऱ्यांनी ८ लाख ५० हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी १२ जणांवर वनगुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हे बाराही जण अहेरी तालुक्यातील रायगट्टा येथील रहिवासी आहेत.
तसेच, 31 जानेवारीला वनाधिकाऱ्यांचे पथक झिमेला जंगलात गस्तीवर असताना कक्ष क्रमांक ५४ मधील राखीव जंगलातून मूल्यवान वृक्षांची कत्तल करुन वाहतूक करताना काही इसम आढळून आले. वनाधिकाऱ्यांनी सर्वांना पकडून २.०१५ घनमीटर लाकूड, ६ बैलगाड्या व १२ बैल असा एकूण ८ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
या प्रकरणी नारायण चिरकेला, राजन्ना जाकेवार, सुरेश आलमवार, समय्या निलमवार, संतोष मोहुर्ले, नागेश चिंतावार, श्रीकांत निलमवार, बापू आलाम, संतोष गादे, मोहन कोलावार, तिरुपती चिंतावार व नरेश निलमवार सर्व रा. रायगट्टा, पो. राजाराम, ता. अहेरी यांच्यावर भारतीय वनअधिनियम १९२७ च्या विविध कलमान्वये वनगुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
गडचिरोली वनवृत्ताचे प्रादेशिक वनसंरक्षक डॉ. किशोर मानकर, आलापल्लीचे उपवनसंरक्षक राहुलसिंह टोलिया, उपविभागीय वनाधिकारी नीतेश देवगडे यांच्या मार्गदर्शनात आलापल्लीचे वनपरिक्षेत्राधिकारी योगेश शेरेकर, क्षेत्रसहायक मोहन भोयर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली.
हे ही वाचलं