मुंबई, पुढारी वृत्तसेवा
माटुंगा येथे सुरु असलेल्या 'मॉक ड्रील' दरम्यान अग्निशमन दलाच्या एका जवानाने पाय गमावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शनिवारी झालेल्या या अपघातात अन्य तीन जवान गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर शीव रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, भाऊ दाजी रोडवरील श्रीनिधी अपार्टमेन्टमध्ये मॉक ड्रिल सुरु होती. मॉक ड्रिल दरम्यान आग विझवण्याचे प्रशिक्षण देत असताना हा अपघात घडला. पाण्याचा पंप चालवताना मर्यादेपेक्षा जास्त इंजिनचा वेग वाढविल्यास गिअर बॉक्स ड्राइविंग मोडमध्ये जातो. परिणामी चालकाशिवाय यंत्राची गाडी पुढे जाते. मॉक ड्रिलदरम्यानही अशाच प्रकारे यंत्र चालकाशिवाय गाडी पुढे गेल्याने अपघात घडल्याची प्राथमिक माहिती आहे.
या दुर्घटनेत अग्निशमन दलाच्या दोन गाड्यांमध्ये चेंगरून गंभीर जखमी झालेल्या तिघांपैकी एका जवानाची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींना सायन रुग्णालयात हलवण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. निवृत्ती सखाराम इंगवले, चंचल भिमराव पगारे आणि सदाशिव धोंडीबा कर्वे अशी जखमी झालेल्या जवानांची आहेत. या तिघांपैकी एका जवानाचा उजवा पाय काढल्याची माहिती आहे.
या अपघाताची वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत सखोल चौकशी केली जाणार असून, पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.
हेही वाचलं का?