मुंबई : पुढारी वृत्तसेवा
आपला महाराष्ट्र हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे. आपण शिवरायांना आदर्श मानतो. आपण झाशीच्या राणींचाही उल्लेख करतो. पण समाजात महिलांना अनेक विचित्र अनुभव येतात. शिवरायांच्या महाराष्ट्रात महिलांना हे अनुभव येऊच नयेत यासाठी आपण सजग राहिले पाहिजे. महिलांवर अत्याचार करणारी सैतानी वृत्तीच मोडून काढली पाहिजे, असे परखड मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी येथे व्यक्त केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते निर्भया पथकाचे उद्घाटन पार पडले. अभासी पद्धतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी राष्ट्रपती पदक विजेत्या पोलिसांचे अभिनंदनही केले.
महिला कुठेही कमी नाहीत. त्या प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत आहेत. मात्र समाजातील काही घटनांमुळे त्या असह्य होतात. एखादी घटना घडते, दुर्घटना घडते अन् हल्लकल्लोळ माजतो. चर्चा होते आणि पुन्हा वातावरण शांत होते. या घटना घडूच नये. अशा घटना घडल्या तर आरोपींचा तिथल्या तिथे बंदोबस्त झाला पाहिजे. त्यासाठीची यंत्रणा आज आपण प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून सुरू करत आहोत ही अभिमानाची गोष्ट आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.
या कार्यक्रमाला मुख्यमंत्री आभासी पद्धतीने उपस्थित होते. त्यामुळे मुख्यमंत्री अभासी पद्धतीने उपस्थित असल्याचा वारंवार उल्लेख केला गेला. त्यावरही उद्धव ठाकरे यांनी कोटी केली. मुख्यमंत्री अभासी पद्धतीने उपस्थित आहेत, असे माझ्याबद्दल सांगितलं गेले माझी उपस्थिती अभासी असली तरी पाठिंबा आभासी नाही, अशी कोटी मुख्यमंत्र्यांनी करताच एकच खसखस पिकली. मी पोलीस आयुक्तांना सांगतो तुम्ही पुढाकार घेतला आहे. मुख्यमंत्री सहायता निधीसाठी तुम्ही मदत करत आहात. ही मदत चांगल्याच कामासाठी आपण वापरू. तुम्हाला जी काही मदत लागेल ती आम्ही देऊ. अगदी शस्त्रांचीही मदत देऊ, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
महिला सुरक्षा मार्गदर्शिकापुस्तिका आपण काढली आहे. ही पुस्तिका जास्तीत जास्त महिलांच्या हातात गेली पाहिजे. या सूचना नीट पाळल्या तर महाराष्ट्र महिला अत्याचार मुक्त झाल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला शुभेच्छा देण्यासाठी अभासी पद्धतीने उपस्थित झालो आहे. तुम्हाला माझ्या शुभेच्छा. आपण मातृभक्त आहोत. देवदेवतांच्या रुपात आपण महिलांची पूजा करतो. महिलांचा रक्षण करणारा हा महाराष्ट्र आहे. आगामी काळात महिलांची सुरक्षा कशी करावी हे देशच नव्हे तर जगही आपल्या महाराष्ट्राकडून शिकेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
हेही वाचलत का?