नागरिकांनी कोरोना लसीकरणासोबत सूचनांचे पालन करावे : अब्दुल सत्तार | पुढारी

नागरिकांनी कोरोना लसीकरणासोबत सूचनांचे पालन करावे : अब्दुल सत्तार

धुळे; पुढारी वृत्तसेवा : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेला गती देण्यात आली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १४ लाख १ हजार १७९ नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे, तर ९ लाख ५९ हजार ७७८ नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. राज्यात आरोग्य सुविधांचे बळकटीकरण करण्यात येत आहे. नागरिकांनीही कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे, असे आवाहन धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे महसूल, ग्रामविकास, बंदरे, खार जमिनी विकास व विशेष साहाय्य विभागाचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी केले आहे.

भारतीय प्रजासत्ताकाचा ७२ वा वर्धापन दिन सोहळा आज उत्साहात संपन्न झाला. यानिमित्त पोलिस कवायत मैदानावर मुख्य शासकीय राष्ट्रध्वज वंदन समारंभ, क्रिडा पुरस्कार वितरण, गुणवंतांचा सत्कार आणि कोरोना विषाणूच्या कालावधीत उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा प्रमाणपत्र देवून गौरव करण्यात आला. जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी धुळे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष डॉ. तुषार रंधे, धुळे शहराचे महापौर प्रदीप कर्पे, आमदार मंजुळाताई गावित, जिल्हाधिकारी जलज शर्मा, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मथी सी., पोलिस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील, महानगरपालिकेचे आयुक्त देवीदास टेकाळे, सहाय्यक जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, अपर पोलिस अधीक्षक प्रशांत बच्छाव, निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड, समाजकल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त हर्षदा बडगुजर यांच्यासह विविध विभागांचे विभागप्रमुख, वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

प्रारंभी पालकमंत्री सत्तार यांनी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन केले. यावेळी पालकमंत्री सत्तार यांच्या हस्ते समाजकल्याण विभागाने तयार केलेल्या व्हिजन डॉक्यूमेंटचे प्रकाशन करण्यात आले. सत्तार म्हणाले की, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली महाविकास आघाडीच्या सरकारची विकासाकडे वाटचाल सुरू आहे. गेल्या दोन वर्षांपासून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सुरू आहे. त्यामुळे प्रत्येकाने दक्षता घेणे आवश्यक आहे. आताही रुग्ण संख्या वाढत आहे. अशा परिस्थितीत प्रत्येक नागरिकाने राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचा अवलंब केला पाहिजे.

कोविड- १९ प्रतिबंधक लसीकरण मोहिम सुरू करण्यात आली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १४ लाख १ हजार १७९ नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे, तर ९ लाख ५९ हजार ७७८ नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांसह फ्रंटलाइन वर्करला बूस्टर डोस देण्यास सुरवात झाली आहे. अद्याप ज्या नागरिकांनी पहिला किंवा दुसरा डोस घेतला नसेल त्यांनी लसीकरण करून घ्यावे.

ऑक्सिजनयुक्त १ हजार ६६८ बेड, १६० व्हेन्टिलेटर उपलब्ध आहेत. ऑक्सिजन प्रकल्प तातडीने कार्यान्वित करण्याच्या सूचना आरोग्य यंत्रणेला दिल्या आहेत. मा. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, कोरोना विषाणूमुळे मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांना ५० हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. आतापर्यंत २०५ प्रस्ताव मंजूर करण्यात आले असून १८ वारसांच्या बँक खात्यात पैसे जमा करण्यात आले आहेत. महिला व बालविकास विभागाच्या माध्यमातून कोरोनामुळे दोन्ही पालक गमावलेल्या १३ बालकांना पाच लाख रुपयांप्रमाणे ६५ लाख रुपयांचा निधी वितरीत केला आहे. बालसंगोपन योजनेंतर्गत ४५८ बालकांना दरमहा ११०० रुपयांप्रमाणे अनुदानाची तरतूद केली आहे. असे त्यांनी सांगितले.

गुणवंतांचा सत्कार

यावेळी सत्तार यांच्या हस्ते विविध क्षेत्रातील गुणवंतांचा गौरव करण्यात आला. त्यात जिल्हाधिकारी शर्मा, निवासी उपजिल्हाधिकारी तथा प्रभारी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी गायकवाड (ध्वजनिधी संकलनात 100 टक्के इष्टांक पूर्ण) यांचा सत्कार करण्यात आला. तसेच राज्य राखीव पोलिस बल गट क्रमांक सहाचे समादेशक प्रल्हाद निवृत्ती खाडे (राष्ट्रपती विशिष्ट सेवा पदक), एकत्रित महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेत उल्लेखनीय कामगिरी बजावल्याबद्दल खानदेश कॅन्सर सेंटर, धुळे, श्री विघ्नहर्ता सुपर स्पेशल हॉस्पिटल, ट्रामा आणि क्रिटिकल केअर सेंटर, धुळे, जिल्हा सामान्य रुग्णालय, धुळे, जिल्हा गुणवंत खेळाडू पुरस्कार प्राप्त प्रमोद शांताराम पाटील यांना दिला.

तर पोलिस पाटील पंकज नथू पाटील (खर्दे, ता. शिरपूर), कमलाकर रघुनाथ रायसिंग (तरडी, ता. शिरपूर), नितीन रुपा जाधव (बभळाज, ता. शिरपूर) आदींचा यावेळी सत्कार करण्यात आला.

Back to top button