मुंबई, कोकणात धुळीचे वादळ | पुढारी

मुंबई, कोकणात धुळीचे वादळ

मुंबई : पुढारी डेस्क

पाकिस्तानातील कराचीतून आलेल्या धुळीच्या वादळाचा फटका रविवारी महामुुंबईला बसला. पुण्यासह अहमदाबाद, कच्छ, सौराष्ट्र या भागांनाही या वादळाने तडाखा दिला. धुळीच्या वादळाचे सावट सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड किनारपट्टीवर पडले. मासेमारी नौका देवगड बंदरात थांबल्या आहेत.

महामुंबईत सकाळपासूनच गार वारे वाहत होते. त्यामुळे हवेत बर्‍यापैकी गारवा निर्माण झाला होता. त्यामुळे धुक्याची चादर पसरली आहे की काय, असे वाटत होते. मात्र, ऊन पडले तरी ती कायम होती. त्यानंतर मात्र हे धुळीचे आच्छादन असल्याचे जाणवले. ‘सफर’ या हवेची गुणवत्ता नोंदवणार्‍या संस्थेचे प्रकल्प संचालक डॉ. गुरफान बेग यांनीही धुळीच्या वादळाच्या वृत्ताला दुजोरा दिला.

धुळीमुळे द़ृश्यमानता कमी झाल्यामुळे वाहने संथगतीने पुढे सरकत होती. मात्र, असे असले तरीही मुंबईत एक्स्प्रेस वे किंवा कुठेही वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र नव्हते. दरम्यान, शनिवारपासून पुढचे तीन दिवस मुंबईसह कोकण, मध्य महाराष्ट्र या ठिकाणी पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला होता. हवामान विभागाने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार, कोकणात अवकाळी पाऊस पडला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर अवकाळी पाऊस झाला.

कुडाळ, सावंतवाडी, दोडामार्ग तसेच वेंग्ाुर्ल्यात पावसाच्या सरी कोसळल्या. महाबळेश्वर, रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली, खेड आणि चिपळूण या ठिकाणीही अवकाळी पाऊस पडला. यामुळे आंबा, काजू पिकांचे नुकसान झाले आहे. मासेमारी व्यवसायावरही गंभीर परिणाम झाला आहे. कमी आवक झाल्याने माशांचे दरही गगनाला भिडल्याचे चित्र रविवारी मच्छी मार्केटमध्ये पाहावयास मिळाले.

राज्यात वाढणार थंडीचा कडाका

उत्तरेकडे प्रचंड बर्फवृष्टी झाल्यामुळे तेथून थंड वारे महाराष्ट्राच्या दिशेने वाहू लागले आहेत. परिणामी, पुढचे तीन दिवस राज्यात थंडीचा कडाका चांगलाच वाढणार आहे. मुंबईसह कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ येथील तापमानात तब्बल 4 ते 5 अंश सेल्सिअस इतकी घट होईल, असा अंदाज पुण्याच्या हवामान विभागाचे प्रमुख डॉ. अनुपम कश्यप यांनी व्यक्त केला.

दम्याच्या रुग्णांनी काळजी घ्यावी

रविवारी सर्वत्र धुळीचे वातावरण होते. अशा वातावरणामध्ये विशेषतः दम्याच्या रुग्णांनी काळजी घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. धूलिकणांमुळे फुफ्फुसात संसर्ग होण्याचा धोका अधिक असतो. त्यामुळे अत्यावश्यक कामासाठीच घराबाहेर पडावे, असा सल्ला लोकमान्य टिळक रुग्णालयातील श्वसन व औषधे विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. नीलंकठ आव्हाड यांनी दिला आहे.

पाऊस थांबल्याने आता वातावरण कोरडे झाले आहे. त्यामुळे वार्‍याचा वेग वाढताच धुळीचे लोट येत आहेत. उत्तर कोकणातून महाराष्ट्रात अनेक ठिकाणी ते दिसले. याचा अंदाज आम्ही दिला आहे. ते किमान बारा तासांसाठी राहील. अफगाणिस्तानातून येणार्‍या चक्रवाताचा हा प्रभाव नाही, हा लोकल इफेक्ट आहे.

-डॉ. डी. एस. पै,

ज्येष्ठ हवामानशास्त्रज्ञ, पुणे वेधशाळा

Back to top button