ग्लोबल टीचर डिसले यांची शिक्षणाधिकांऱ्याकडून अडवणूक - पुढारी

ग्लोबल टीचर डिसले यांची शिक्षणाधिकांऱ्याकडून अडवणूक

सोलापूर; पुढारी ऑनलाईन : शिक्षणामध्ये नव्या वाटा शोधत त्यात यशही मिळवले. तब्बल सात कोटी रुपयांचा ग्लोबल टीचर हा अवार्ड पटकावला. ग्लोबल टीचर रणजितसिंह डिसले यांच्यावर कौतुकाबरोबरच टीकेची झोडही उठली. आता नव्याने एक वाद उफाळून आला असून अमेरिकेत ते उच्च शिक्षणासाठी जाणार असून यासाठी त्यांनी शिक्षण अधिकार्‍यांकडे अर्ज दिला आहे. प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी आधी शाळेतील विद्यार्थ्यांना शिकवायला हवं ना! असा प्रश्न उपस्थित केला आहे. अशा प्रकारे डिसले यांची अडवणूक केली जात आहे.

पंढरपूर तालुक्यातील परिते शाळेचे शिक्षक डिसले गुरूजींना अमेरिकेची स्कॉलरशिप मिळाली. त्यांना ग्लोबर टिचर पुरस्कारही मिळाला. जागतिक बँकेवर त्यांची निवडही झाली. पण, त्या गुरुजींच्या कामावर आता चक्क शिक्षणाधिकारीच प्रश्न उपस्थित करत आहेत.

कोरोनामुळे दोन वर्षांपासून सर्व शाळा बंद होत्या आणि आता सुद्धा शाळा बंद आहेत. या काळात डिसले गुरूजी यांनी वेगवेगळ्या मार्गांनी विद्यार्थ्यांना शिकवण्याचे काम केले आहे. या कोरोनाच्या काळात डिसले गुरूजींनी शिक्षकांनी गुणवत्ता कशी वाढवावी, ऑनलाईन शिक्षणाशिवाय दुसरे पर्याय शोधून काढत शिक्षणाचा नवा पॅटर्न समोर आणला होता.

परदेशात दिल्या जाणाऱ्या शिक्षणावरही त्यांनी अभ्यास केला आहे. यामुळेच त्यांची वर्ल्ड बँकेच्या शिक्षण सल्लागारपदी निवड झाली. त्यानंतर त्यांना अनेक पुरस्कार मिळाले. जेव्हा त्यांना अमेरिकेची स्कॉलरशिप जाहीर झाली, तेव्हा त्यांनी आपल्या रजेचा अर्ज शिक्षण अधिकाऱ्यांकडे दिला होता. साधारण दीड महिन्यांपूर्वी त्यांनी रजेसाठी अर्ज दिला होता. पण त्यांच्या अर्जात त्रुटी असल्याचे कारण पुढे करत त्यांची रजा मंजूर करण्यात आली नाही.

गेल्या तीन वर्षांपासून डिसले गुरूजी शाळेत गैरहजर आहेत. रजेच्या अर्जात त्रुटी असल्याने तो मंजूर झाला नाही. परदेशात स्कॉलरशिपला गेल्यानंतर शाळेचं काय करणार ? आधी शाळेच्या मुलांना शिकवायला हवं ना ? जिल्हा परिषदेच्या शाळांसाठी त्यांनी काही प्रयत्न केलेत असे मला दिसले नाही.
-डॉ. किरण लोहार,
प्राथमिक शिक्षण अधिकारी

शिक्षणाधिकाऱ्यांचे आदेश लेखी स्वरूपात मिळाल्यानंतर आपली भूमिका मांडणार आहे. अधिकाऱ्यांकडून पैशाची मागणी होत आहे. त्यामुळे मानसिक त्रास होतोय. यातून काम करण्याची इच्छा मारली जात आहे. याचा अधिक त्रास राज्यपाल यांच्या दौऱ्याच्या पार्श्‍वभूमीवर झाला.
– रणजितसिंह डिसले गुरुजी

Back to top button