Shivsena - Bjp : नगरसेवक स्थायी समिती दालनाबाहेर भिडले - पुढारी

Shivsena - Bjp : नगरसेवक स्थायी समिती दालनाबाहेर भिडले

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : स्थायी समितीत प्रस्ताववर बोलू देत नाही, याच्या निषेधार्थ भाजप नगरसेवकांनी ( Shivsena – Bjp ) स्थायी समिती अध्यक्षांच्या दालनाबाहेर निदर्शने केली. ही निदर्शने हाणून पाडण्यासाठी शिवसेना नगरसेवकांनी शिवसेना झिंदाबादच्या घोषणा देत, महापालिका मुख्यालय दणाणून सोडले. यावेळी भाजप नगरसेवकांनीही शिवसेना मुर्दाबाद अशा घोषणा दिल्या. त्यामुळे काही काळ वातावरण चांगलेच तापले होते.

स्थायी समितीची शुक्रवारी ऑनलाईन बैठक पार पडली. या बैठकीत बोलू न दिल्याच्या निषेधार्थ भाजप नगरसेवकांनी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या दालनाबाहेर निदर्शने केली. भाजप नगरसेवकांनी शिवसेना मुर्दाबाद. स्थायी समिती अध्यक्ष मुर्दाबाद.. अशी घोषणाबाजी केली. या वेळी शिवसेना नगरसेवकांनी अदानी, अंबानीला देश विकणाऱ्या भाजपा चा निषेध असो अशी घोषणाबाजी सुरू केली. भाजप नगरसेवक शिवसेना मुर्दाबाद बोलत असताना त्यांच्या सुरात सूर मिसळत शिवसेना नगरसेवक जिंदाबाद अशी घोषणा देत होते. तासभर चाललेल्या या घोषणाबाजी नंतर स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी भाजप गटनेते प्रभाकर शिंदे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना निदर्शने मागे घेण्याची विनंती केली. परंतु आम्हाला बोलू का दिले नाही यावर ठाम राहत भाजपने निदर्शने सुरू ठेवली. ( Shivsena – Bjp )

या निदर्शनावर बोलताना यशवंत जाधव यांनी स्थायी समितीत भाजप सदस्यांना सर्वाधिक बोलायला दिले जाते. नोव्हेंबर 2021 पासून आतापर्यंत भाजप नगरसेवकांना कोणकोणत्या प्रस्तावावर बोलू दिले, याची यादीच जाधव यांनी सादर केली. स्थायी समितीत 100 पेक्षा जास्त प्रस्ताव असतात. प्रस्ताव पुकारल्यानंतर हात वर करणाऱ्या सदस्यांना बोलण्याची संधी दिली जाते. त्यामुळे बोलू देत नाही, हे भाजप सदस्यांचे म्हणणे निराधार आहे. स्थायी समिती अध्यक्षांची अरेरावी सुरू असून त्यांच्या मर्जीप्रमाणे केवळ काही प्रस्तावांवर चर्चा होते. अन्य अर्थपूर्ण प्रस्तावावरील अनियमिततेबाबत भाजपा सदस्यांनी आक्षेप घेतल्यास त्यांना बोलू दिले जात नाही. ही सरळ हुकूमशाही असून हा प्रकार लोकशाही मूल्यांची गळचेपी करणारा असल्याची घणाघाती टीका भाजप गटनेते प्रभाकर शिंदे यांनी केली. ( Shivsena – Bjp )

 

Back to top button