डोंबिवली; भाग्यश्री प्रधान आचार्य : डोबिंवली शहराची ओळख सांस्कृतिक शहर अशी आहे. सोमवारची सकाळ मात्र संपूर्ण शहराला अस्वस्थ करणारी ठरली. टिळक चौकात विजया बाविस्कर या महिलेचा घरातच खून झाल्याचे उघडकीस आले होते. शांत आणि इतरांना मदत करण्याचा स्वभाव यामुळे बाविस्कर यांचा खून होणं हे सहाजासहजी कुणाला पटत नव्हते. (Dombivli Crime)
बाविस्कर यांच्या घरी काम करणारी बाई सोमवारी सकाळी त्यांच्या घरी आली. बाविस्कर कुठे तरी बाहेर गेल्या असतील असे समजून तिने दरवाजा ढकलला. दरवाजाला बाहेरून कडी होती. कडी उघडून तिने घरात प्रवेश करताच तिला जे काही दिसले ते काळजात धस्स करणारे होते. बाविस्कर या मृताअवस्थेत पडलेल्या होत्या. घाबरलेली बाई तशीच बाहेर आली, घडला प्रकार तिने शेजाऱ्यांना सांगितला आणि लगेचच पोलिसांनाही कल्पना दिली.
पोलिसही तातडीने घटनास्थळी आले. बाविस्कर यांचा गळा आवळून खून झाला होता, हे पोलिसांच्या लक्षात आले. बाविस्कर या घटस्फोटित होत्या. ३० वर्षांपूर्वीच त्यांचा घटस्फोट झाला होता, आणि त्या वडिलांकडे राहत होत्या. सहजासहजी कुणावर संशय घ्यावा अशी काही स्थिती नव्हती. बाविस्कर यांची प्रॉपर्टीही चांगली असल्याने प्रॉपर्टीचा काही वाद आहे, अशी शंका पोलिसांना आली होती.
पोलिसांनी तपासासाठी ५ पथके नेमली. यादरम्यान बाविस्कर यांच्याकडे रविवारी रात्री एक महिला आली होती, असे पोलिसांना समजले. लगेचच या महिलेबद्दल तपास सुरू केला.
रविवारी संध्याकाळी सीमा आणि बाविस्कर यांची भेट झाली होती. चांगल्या गप्पाही झाल्या होत्या. आज माझ्या घरी कुणी नाही, तर मी तुझ्या घरी मुक्कामाला येऊ का, असा सवाल सीमाने केला होता. बाविस्कर यांनीही होकार दिला.
रात्री बराच वेळ गप्पा झाल्यानंतर सीमाने बाविस्कर यांचा घात केला. गळा दाबून सीमाने बाविस्करांचा खून केला आणि त्यांच्याकडील दागिने लुटल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.
सीमा यांचे पोळी भाजी केंद्र प्रसिद्ध आहेत. पोळी भाजी केंद्रावर १६ लाखांच्या कर्जामुळे जप्ती येणार होती. कर्जाची रक्कम भागवण्यासाठी तिने चोरीचा मार्ग स्वीकारल्याचे तापासात समोर आले आहे. या गुन्ह्यात इतर कुणी सहभागी आहे का? दुसरे काही कारण आहे का? याही बाबींचा तपास पोलिस करत आहेत.
या प्रकरणात अप्पर पोलीस आयुक्त कराळे, पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त जयराम मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली टिळक नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय आफळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक चुंबले, बाकले, धोंडे, मुंजाल अधिक तपास करत आहेत.