

चेंबूर: आरसीएफ फॅक्टरी परिसरातील व्हीआयपी रोडवर शनिवारी रात्री (दि.२ नोव्हेंबर) साडेनऊच्या सुमारास तब्बल १० फूट लांबीचा भारतीय रॉक पायथन (अजगर) दिसल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली. या अजगराला पाहून नागरिकांनी घाबरून तातडीने सर्पमित्रांना याची माहिती दिली.
माहिती मिळताच सर्पमित्रांनी घटनास्थळी धाव घेतली आणि अजगराला सुरक्षितरित्या पकडून वनविभागाच्या ताब्यात दिले. कॉल करणारे सौरभ थाले यांनी सांगितले की, व्हीआयपी रोडलगतच्या झाडीत इतक्या मोठ्या आकाराचा अजगर दिसल्याने नागरिक भयभीत झाले होते.
या घटनेची माहिती मिळताच सर्पमित्र शेखर मैत्री, दीपक निर्मल आणि सिद्धार्थ गायकवाड यांनी त्वरित घटनास्थळ गाठले. त्यांनी त्वरित योग्य कौशल्य आणि दक्षता वापरून अजगराला कोणतीही इजा न करता पकडले आणि त्याला सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी वनविभागाकडे सुपूर्द केले.