

Python successfully rehabilitated after 45 days of post-surgery treatment
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : वन्यजीव संवर्धनाच्या दिशेने एक उल्लेखनीय पाऊल उचलत, गंभीर जखमी अवस्थेत आढळलेल्या भारतीय अजगराचा तब्बल ४५ दिवसांच्या शस्त्रक्रियेनंतरच्या उपचार व देखभालीनंतर यशस्वी पुनर्वसन करण्यात आले आहे. ही मोहीम मॅनविथइंडीज फाउंडेशन आणि वन विभाग यांच्या संयुक्त प्रयत्नांतून राबविण्यात आली.
१२ सप्टेंबर रोजी स्थानिक सर्पमित्रांना एका अजगराच्या शरी-रावर खोल जखमा आढळल्या. त्यांनी तत्काळ मॅनविथइंडीज फाउंडेशनच्या वन्यजीव उपचार केंद्राशी संपर्क साधला. तेथे वन्यजीव वैद्यक डॉ. अमित परदेशी यांनी शस्त्रक्रिया करून त्याचा जीव वाचवला. ४७ दिवसांच्या अखंड उपचार व निरीक्षणानंतर, अजगर पूर्णपणे बरा झाला आणि त्याच्या नैसर्गिक अधिवासात परत सोडण्यात आला.
ही मोहीम उपवनसंरक्षक सुवर्णा माने, सहायक वनसंरक्षक आशा चव्हाण आणि वनपरिक्षेत्र अधिकारी सागर कुटे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. मॅनविथइंडीज फाउंडेशनचे शुभम साळवे आणि सुरज पानकडे यांनी अजगराला सुरक्षितपणे त्याच्या मूळ अधिवासात मुक्त केले.
वन्यजीव बचाव दलाचे प्रमुख आशिष जोशी यांनी सांगितले की, अजगर हे शी-तरक्तीय प्राणी असल्यामुळे त्यांचा शरीरातील तापमान व चयापचय हे बाह्य उष्णतेवर अवलंबून असते. त्यांची त्वचा शल्कयुक्त असल्याने जखम भरायला तुलनेने अधिक वेळ लागतो. योग्य तापमान, आर्द्रता आणि नैसर्गिक अधिवास जपल्यामुळे उपचारकाळात त्याच्या जखमा भरण्याची गती वाढली.