

मनाठा : हदगाव तालुक्यातील शेंदन येथे आज दिनांक 9 ऑक्टोबर 2025 वार गुरुवार दुपारी सुमारे तीन वाजता शेंदन येथील शेतकरी लक्ष्मण साळवे यांच्या शेतात सोयाबीन कापणीचे काम सुरू असताना अचानक मोठा अजगर साप दिसल्याने एकच गोंधळ उडाला. सापाचे आकारमान पाहून कामगार भयभीत झाले. मात्र, शेतकऱ्याने तत्काळ तामसा सर्कल (ता. हादगाव) येथील सर्पमित्र राहुल सरकुंडे यांना माहिती दिली.
माहिती मिळताच राहुल सरकुंडे यांच्या नेतृत्वाखालील टीम वैभव शहाणे, हनुमान डाकोरे, मंगेश सरकुंडे, अविनाश हटकर आणि गजानन शेटे.घटनास्थळी दाखल झाली. परिसरातील लोकांना सुरक्षित अंतरावर ठेवून दोन तासांच्या संयमित आणि कौशल्यपूर्ण प्रयत्नांनंतर अजगराला सुरक्षितपणे पकडण्यात आले.
सापाची लांबी ११ फूट, गोलाई १२ इंच आणि वजन सुमारे १२.५ किलो होते. इतक्या मोठ्या आकाराचा अजगर या भागात आढळणे अत्यंत दुर्मिळ असल्याचे स्थानिकांनी सांगितले. पकडलेला साप वन विभागाच्या मार्गदर्शनाखाली सुरक्षित जंगलात सोडण्यात येणार आहे, अशी माहिती सर्पमित्रांनी दिली.
सापांविषयी अजून गैरसमज
“सापांविषयी लोकांमध्ये अजूनही भीती आणि गैरसमज आहेत. परंतु साप हा निसर्गाचा एक महत्त्वाचा घटक आहे आणि शेतकऱ्याचा मित्रही आहे. तो उंदरांवर नियंत्रण ठेवतो आणि पर्यावरणाचे संतुलन राखतो. त्यामुळे साप दिसल्यास घाबरू नका, त्याला मारू नका. त्वरित जवळच्या सर्पमित्राशी संपर्क साधा. अशी आवाहन सर्पमित्र, राहुल सरकुंडे यांनी केले.