वाशिम ; पुढारी वृत्तसेवा : हळकुंड स्वच्छ करण्याच्या यंत्रावर काम करत असताना एका महिला कामगाराचा मृत्यू झाला आहे. ही घटना (गुरूवार) ४ जानेवारी रोजी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास अकोला-हिंगोली मार्गावरील जय गजानन कृषी बाजार समितीत घडली. या प्रकरणी वाशिम ग्रामीण पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, रेखा दौलत इंगोले (वय ४५ वर्षे) रा. पंचाळा, वाशिम, असे मृत महिलेचे नाव आहे.
या विषयी अधिक माहितीनुसार, रेखा दौलत इंगोले या जय गजानन कृषी बाजार समितीत हळकुंड स्वच्छ करण्याचे काम करतात. गुरूवारी त्या काम करत असताना यंत्राच्या पंख्यामध्ये रेखा इंगोले यांचा पदर किंवा डोक्याला बांधलेला रुमाल अडकल्याने त्या यंत्राकडे खेचल्या गेल्या. यात त्यांना गंभीर दुखापत झाली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर ग्रामीण पोलिस स्टेशनचे ठाणेदार प्रमोद इंगळे यांनी घटनास्थळी भेट दिली, तसेच रेखा इंगोले यांना जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. मात्र त्या ठिकाणी डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
या प्रकरणी वाशिम ग्रामीण पोलिसांत आकस्मिक मृत्यूची (मर्ग) नोंद करण्यात आली आहे. मृत रेखाताई इंगोले यांचा मृत्यू नेमका कसा झाला, याचे कारण अद्यापही अस्पष्ट असून, शवविच्छेदन अहवालानंतरच यामागील कारण स्पष्ट होईल.
हेही वाचा :