शिर्डी : पुढारी वृत्तसेवा, राजकीय दृष्टीने आपल्या विचारांशी सुसंगत भूमिका जे घेत नाहीत, त्यांच्याविरुद्ध सत्तेचा गैरवापर सध्या सुरू आहे. या पार्श्वभूमीवर मोदी यांच्याविरुद्ध देशभरातील विरोधकांची मूठ बांधून आगामी लोकसभा निवडणुकांचे रणशिंग फुंकणार आहोत. मोदींना सत्तेवरून हटविणे हाच 'इंडिया' आघाडीचा पहिला कार्यक्रम असेल, असा निर्धार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज (गुरुवारी) येथे व्यक्त केला. (Sharad Pawar)
राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन दिवसांच्या शिबिराचा समारोप करताना पवार बोलत होते. देशासह राज्यातील महागाई, बेरोजगारी, महिलांची सुरक्षा, ईडी, सीबीआयचा गैरवापर, शेतकरी आत्महत्या अशा विविध विषयांवर खेद व्यक्त करीत पवार यांनी सत्ताधारी पक्षांवर चौफेर टीका केली. ईडी, सीबीआय या यंत्रणांचा उपयोग विरोधी पक्षांच्या नेत्यांविरुद्ध केला जात आहे. दिल्लीचे प्रामाणिक मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीतर्फे केव्हाही अटक केली जाऊ शकते. झारखंडच्या मुख्यमंत्र्यांनाही अटकेची नोटीस आलेली आहे. सत्तेचा दुरुपयोग करून विरोधकांना नाउमेद करण्याचे काम सध्या सुरू आहे, असे स्पष्ट करून शरद पवार म्हणाले, मोदींना पर्याय नाही, असा खोटा प्रचार सध्या केला जात आहे.
पोकळ घोषणाबाजीतून दिशाभूल देशासह राज्यात सत्ताधाऱ्यांकडून आक्रमक यंत्रणा उभी केली जात आहे. पोकळ घोषणाबाजी करून जनतेची दिशाभूल केली जात आहे. २०२४ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करू, असे सरकारचे नेते सांगतात; मात्र शेतकरी कर्जाच्या डोंगराखाली दबला आहे. देशातील नवी पिढी हाताला काम मागते आहे; मात्र सत्ताधाऱ्यांकडून केवळ घोषणांचा पाऊस पडत आहे.
मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसींवर अन्याय होता कामा नये, अशी ठाम भूमिका घेत शरद पवार यांनी आपले मत मांडले. ते म्हणाले, एकीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणतात, आम्ही आरक्षण देऊ, तर याच वेळी त्यांच्याच पक्षाचे मंत्री म्हणतात 'सध्या तरी हे शक्य नाही.' ही दुहेरी चाल सरकार खेळत असल्याने मराठा तरुणांची फसवणूक होत आहे.
सध्या मोदी आणि भाजपकडून लोकसभेच्या ४०० पार जागांचा दावा केला जात आहे; पण चित्र भाजपसाठी अनुकूल नाही, असे स्पष्ट करत पवार म्हणाले, केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, झारखंड, दिल्ली, पंजाब अशा कितीतरी राज्यांमध्ये भाजपची सत्ता नाही.
हेही वाचा