बीड : गेवराई बस स्थानक पुन्हा गजबजले : २८९ कर्मचारी रुजू

बीड : गेवराई बस स्थानक पुन्हा गजबजले : २८९ कर्मचारी रुजू

गेवराई : गजानन चौकटे

मागील सहा महिन्यांपासून विलिनीकरणाच्या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू होता; परंतु न्यायालयाच्या आदेशानुसार टप्प्याटप्प्याने कर्मचारी आता कामावर हजर झाले. आज ( दि. २४ )  सुट्टी असल्याने गेवराई बस स्थानकात प्रवाशांची गर्दी दिसून आली. सकाळच्या सुमारास चैतन्यमय वातावरण बसस्थानकात दिसून आले. परिसरात रंगरंगोटी करण्यात आली असून, परिसर प्रवाशांमुळे गजबजू लागला आहे. बस सुरू झाल्याने रिक्षा चालकांसह छोट्या मोठ्या व्यावसायिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

लालपरी ग्रामीण भागाची जीवनवाहिनीच आहे. प्रवाशांनी खचाखच भरून वाहणारी एसटी हात दाखवेल तेथे थांबते. त्यामुळेच एसटी चिमुकल्यापासून वृध्दापर्यत हवीहवीशी वाटते. एसटी बस आता थाटामाटात पुन्हा धावू लागल्याचा आनंद सर्वांनाच होत आहे. परंतु, कोरोना महामारी आणि नंतर विलीनीकरणाच्या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू झाला.  गेल्या आठवड्यात न्यायालयाने कामावर हजर होण्यासाठी कर्मचाऱ्यांना २२ एप्रिलचा अल्टिमेटम दिला होता. त्यामुळे आता बहुतांश कर्मचारी हजर झाल्याची माहिती आगार प्रमुख बालाजी अडसुळ यांनी दिली.

बसची पूजा करतान भावना अनावर

एसटी कर्मचारी एक एक करत आपल्या कामावर रूजू होत असून बसची पूजा करून कामावर रूजू होत आहेत. या वेळी अनेक कर्मचार्‍यांना  भावना अनावर झाल्या होत्या.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एस.टी.) गेवराई विभागातून लालपरीची सेवा पूर्ववत झाली आहे. सध्या ४५ नियमित गाड्या मार्गावर धावू लागल्या आहेत. रोज १७ हजार किलोमीटर अंतरावर बस धाऊ लागल्या आहेत. त्यामुळे एस. टी. आगार प्रवाशांच्या गर्दीने फुलू लागले आहे. रविवार पर्यंत २८९ कर्मचारी कामावर हजर झाले आहेत. गेवराई आगारातून पुणे, मुंबई, तुळजापूर, सोलापूर, औरंगाबाद, पैठण उमरगा, लातूर, हैदराबाद, पंढरपूर आदी ठिकाणी बस सुरू झाल्या आहेत. सुमारे ५ लाखांच्या पुढे उत्पन्न होत आहे .

– बालाजी आडसूळ (प्रभारी आगार प्रमुख, गेवराई)

हेही वाचलंत का ?  

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news