केंद्राच्या योजनांची नावे बदलून श्रेय घेण्याचा प्रकार निंदनीयः शांतनु ठाकूर

केंद्राच्या योजनांची नावे बदलून श्रेय घेण्याचा प्रकार निंदनीयः शांतनु ठाकूर

उमरखेड; पुढारी वृत्तसेवाः केंद्रातील मोदी सरकारने अनेक लोक कल्याणकारी योजना देशात राबविणे सुरू केले. या योजनांची अंमलबजावणी राज्य सरकारांच्या सहकार्याने होते. परंतु ज्या ठिकाणी भाजप विरोधी सरकार आहे. अशा राज्यांमध्ये केंद्र सरकारच्या विविध लोक कल्याणकारी योजनांची नावे बदलून त्यांच्या अंमलबजावणीचे श्रेय घेण्याचे सुरू आहे. विशेषताः प्रधानमंत्री ग्रामसडक योजना व प्रधानमंत्री आवास योजना या योजनांचे नाव बदलून  पश्चिम बंगाल व महाराष्ट्र या राज्याने त्यांची  अंमलबजावणी सुरू करून श्रेय घेण्याचा प्रकार सुरू केला. तो निंदनीय आहे, अशी टीका केंद्रीय राज्यमंत्री शांतनु ठाकूर यांनी बुधवारी (दि. २१)  येथे केली.

भारतीय जनता पक्षाच्या, लोकसभा प्रवास योजनेअंतर्गत हिंगोली लोकसभा क्षेत्रातील पक्ष कार्याचा आढावा तसेच विविध कार्यक्रमासाठी ठाकूर आज येथे आले होते. यावेळी त्यांनी स्थानिक पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा, आमदार नामदेव ससाने, रामराव वडकुते, माजी राज्यमंत्री राणा जगजितसिंह, अॅड. शिवाजीराव जाधव, दत्तदिगंबर वानखेडे आदी उपस्थित होते.

येत्या २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने भारतीय जनता पक्षाने देशातील १४४ लोकसभा मतदारसंघांवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील १६ लोकसभा मतदारसंघाचा समावेश असून हिंगोली लोकसभा मतदारसंघ हा त्यापैकी एक आहे. या मतदारसंघाचे दायित्व केंद्रीय राज्यमंत्री ठाकूर यांच्याकडे देण्यात आले आहे, अशी माहिती यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष भुतडा यांनी दिली.

दरम्यान, ठाकूर यांनी केंद्र सरकारच्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांची मनोगते जाणून घेतली. पंतप्रधान घरकुल योजना व पंतप्रधान ग्रामसडक योजना यामध्ये निधी वाटपात राज्यात दिरंगाई होत असल्याच्या तक्रारीबाबत नाराजी व्यक्त केली. या योजनांचा फेर आढावा घेण्यासाठी केंद्र सरकारने समिती गठीत केली आहे. ज्या राज्यांमध्ये योजनेच्या अंमलबजावणीबाबत व परिणामकारकतेबाबत सविस्तर आढावा घेऊन  निधी देण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

हेही वाचलंत का ? 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news