परळी वैजनाथ, प्रा.रविंद्र जोशी : रक्षाबंधन हा भाऊ-बहिणीचा सण मानला जातो. या दिवशी बहीण भावाच्या मनगटावर रक्षासूत्र बांधते आणि भाऊ तिला वाईटांपासून वाचवण्याची शपथ घेतो. आज (बुधवार) रक्षाबंधनाचा सण देशभरात मोठ्या थाटामाटात साजरा होत आहे. रक्षाबंधनाच्या निमित्ताने परळीतील बहिण भावाच्या अतुट नात्याची कहाणी खरोखरच अतुलनीय आहे. 'रक्षा बंधन'ची अनोखी मिसाल निर्माण करत या बहिणीमुळे भावाला 'जीवन दान' मिळाले ही आदर्श कहाणीच तयार झाली आहे.
परळी येथील पत्रकार रामप्रसाद शर्मा यांचा मुलगा अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या गोपाळ याची तीन वर्षांपूर्वी तपासणी केली असता दोन्ही मुत्रपींड (किडणी) निकामी झाल्याचे निदान झाले. आई-वडिलांना विविध व्याधी आणि घरात इतर कुणीही दाता नसल्याने कुटुंबाची होणारी होरपळ बघून अत्यंत स्वयंस्फूर्तपणे व तितक्याच धिरोधात्तपणे धाकटी बहीण ही (किडणी) मूत्रपिंडदाता म्हणून भावाच्या पाठीशी भक्कमपणे उभी राहिली. कुठलाही विचार न करता अवघ्या २० व्या वर्षी सर्वोच्च दान दिले आणि आपल्या भावाला मृत्युच्या जबड्यातून अक्षरशः बाहेर काढले. बहिणीचा त्याग कामी आला आणि भिन्न रक्तगटाचे मूत्रपिंड प्रत्यारोपण यशस्वीही झाले. आता दोघेही आपापले करिअर घडवण्यासाठी व आयुष्यात उभे राहण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज झाले आहेत.
बहीण-भावाच्या पवित्र नात्याला आणखी उदात्त करण्याचा प्रयत्न केला आहे तो परळी वैजनाथ येथील राधिका या २० वर्षांच्या युवतीने. गोपाल या तिच्या २२ वर्षांच्या सख्ख्या भावाचे दोन्ही (किडणी) मूत्रपिंड निकामी झाल्याचे स्पष्ट झाले आणि कुटुंबाला मोठा धक्काच बसला. मूत्रपिंड प्रत्यारोपणाशिवाय पर्याय नसल्याचे स्पष्ट झाले. तोपर्यंत डायलिसिस सुरू झाले होते आणि दात्याचा शोध यक्ष प्रश्न होता. गोपालच्या वडिलांना उच्चरक्तदाबाचा त्रास होता, तर आईच्या एका मूत्रपिंडाची समस्या होती. अखेर राधिकाने मूत्रपिंडदानाचा मनोमन निर्णय आई-वडिलांना बोलून दाखवला. मात्र आई-वडील काही तयार होत नव्हते. पुढच्या सगळ्या उभ्या आयुष्याचं काय, लग्नाचं काय, अशा सगळ्या प्रश्नांमुळे अवघ्या २० वर्षांच्या मुलीचे किडनीदान हे आई-वडिलांच्या पचनी पडत नव्हते. मात्र दुर्दैवाने दुसरा कोणताही पर्याय समोर येत नव्हता आणि जवळजवळ दोन वर्षांपासून गोपालचे डायलिसिस सुरू होते. साहजिकच प्रत्यारोपणासाठी उशीर होत होता आणि राधिका हट्टाला पेटल्यामुळे शेवटी आई-वडीलांनी परवानगी दिली. मात्र राधिकाच्या चाचण्या केल्या नंतर दोघांचे रक्तगट भिन्न असल्याचे लक्षात आले. परंतु भिन्न रक्तगटाचे प्रत्यारोपण निश्चितपणे यशस्वी होऊ शकते, असा विश्वास डॉक्टरांनी दिल्यानंतर प्रत्यारोपणाची तयारी सुरू झाली. अखेर २४ डिसेंबर २०२१ रोजी छत्रपती संभाजी नगर शहरातील युनायटेड सिग्मा हॉस्पिटलमध्ये प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया झाली. आणि ती यशस्वी झाली.
मला माझा भाऊ पुन्हा एकदा ठणठणीत हवा होता आणि त्यासाठी मी काहीही करण्यास तयार होते. अर्थात, प्रत्यारोपण उत्तम झाले आणि मला काहीही त्रास नाही. मी सगळे काही करू शकते.
– राधिका शर्मामूत्रपिंडदानातून मला मिळालेले नवीन आयुष्य हे माझ्या बहिणीने मला दिलेले अनमोल गिफ्ट आहे. केवळ भाऊच नव्हे तर बहीणदेखील आपल्या भावासाठी काहीही करू शकते, हेच यातून अधोरेखित झाले आहे.
– गोपाळ शर्मा
हेही वाचा :