आवक घटली…भाजीपाला कडाडला; जुनमध्ये पावसाचा फटका ; महिनाभर भाव स्थिरावणार

संग्रहित फोटो
संग्रहित फोटो
Published on
Updated on

परभणी; पुढारी वृत्तसेवा : संपुर्ण जुन महिन्यात पावसाचे आगमन न झाल्याचा परिणाम भाजीपाला पिकांवर मोठया प्रमाणात झाला असून जिल्हयातील भाजीपाल्यांचे उत्पादन घटल्याने परजिल्हयातून व परराज्यातून येणार्‍या भाजीपाल्यांची आवक ही भाव वाढविणारी ठरली आहे.

संपूर्ण भाजीबाजारात भाज्यांचे भाव कडाडले आहेत. त्याचा फटका सर्वसामान्यांच्या खिशाला बसू लागला आहे. महिनाभरातील पावसाची गैरहजेरी पुढील महिनाभर देखील भाजीपाल्यांचे कडाडलेले भाव स्थिर राहण्यास होणार आहे. जिल्हयातील भाजीपाला घेणार्‍या शेतकर्‍यांची संख्या मोठी आहे. मात्र यंदा सर्वच तालुक्यांतून भाजीपाल्यांच्या उत्पादनात घट झाली आहे. मेपर्यंत थोडयाफार पाण्यावर निघणारा भाजीपाला स्थानिक पातळीवर येत होता. मात्र मृग नक्षत्रापासून पावसाने पुरेशा प्रमाणात हजेरी लावलेली नाही.

दोन्ही नक्षत्र कोरडी गेल्यानंतर सर्वसामान्य शेतकरी पेरणीविना राहिला आहे. त्यातही थोडयाफार पाण्यावर भाजीपाला घेवून उल्पन्‍नाचे स्त्रोत मिळविणार्‍या उत्पादक शेतकर्‍यांचीही मोठी कोंडी झाली आहे. जून महिना संपत असतानाही मागील दोन दिवसांपासून ढगाळी वातावरण असताना पावसाच्या तुरळक सरी कोसळल्या.

संपूर्ण महिनाभरात केवळ १५ ते २० मिलीमिटर झालेला पाऊस जमिनीची ओल वाढविण्यासही सहायभुत ठरला नाही त्यामूळे पेरण्या पुर्णपणे खोळंबल्या आहेत. पेरण्यांबरोबरच भाजीपाला उत्पादनही पाण्याअभावी ठप्प झाले आहे. ठोक व किरकोळ भाजीबाजारात सर्वच भाज्यांच्या भावांत मोठी वाढ झाली आहे. स्थानिक पातळीवर भेंडी व वांगी सारख्या भाज्या उपलब्ध होत आहेत. त्यांचे भाव फारसे वाढलेले नाहीत. भेंडी ६० रूपये प्रति किलो तर वांगी ४० रूपये प्रति किलो इतकी आहेत.

भाजीपाला बाजारपेठेत स्थानिक आवक घटल्याने परराज्यातून विशेषत: तेलंगणा व कर्नाटकातून काही भाज्या दाखल होवू लागल्या आहेत. राज्याच्या इतर भागातूनही ठराविक भाज्यांची आवक बाजारपेठेत होत आहे. त्यामध्ये मदनपल्‍ली (तेलंगणा) येथून दाखल होणारा टोमॅटो १०० रूपये प्रति किलोवर जावून पोहचला आहे.

मागील महिन्यात टोमॅटो केवळ ३० ते ४० रूपये किलो भावाने विकला गेला. त्यामुळे टोमॅटोत झालेली मोठी वाढ नागरिकांना डोकेदुखी ठरली आहे. त्याचबरोबर गवार, दोडके, फ्लॉवर, मेथी, लिंबू व हिरवी मिरचीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. हिरवी मिरची ही बेळगाव(कर्नाटक) येथून येत असून तब्बल १०० रूपये प्रति किलोवर जावून पोहचली आहे.

खंडाळा येथून येणारा कांदा मात्र २० रूपये प्रति किलो दराने किरकोळ बाजारात विकला जात आहे. मागील ४ दिवसांपासून भाज्यांच्या भावात वाढ झाली असून आवक कमी असण्याचा हा परिणाम आहे.

किरकोळ बाजारातील दर

पालक ४० रूपये प्रति किलो, गवार ६० रूपये, दोडके ८० रूपये, पाणकोबी ४० रूपये, कोथिंबीर १५० रूपये, सिमला मिरची ५० रूपये, बटाटे २० रूपये, मेथी १०० रूपये प्रति किलो, आद्रक २००रूपये प्रति किलो.

महिनाभर भाव वाढलेलेच

मागील चार दिवसांपासून आवक घटल्याने बाहेरच्या राज्यातून येणार्‍या भाज्यांचे दर वाढलेले आहेत. मागील महिन्यात अर्ध्यावर असलेले दर आता दुपटीने वाढल्याने घाऊक बाजारात भाज्या जादा दराने उपलब्ध होवू लागल्या आहेत. त्याचा परिणाम किरकोळ बाजारातही विक्रेत्यांना चढया भावाने भाज्याविक्री करण्याची वेळ आली आहे. साधारणत: महिनाभर अशीच स्थिती राहणार आहे. त्यामुळे सणावारांच्या दिवसात भाज्यांचे दर वाढलेलेच असतील अशी माहिती भाजीपाला विक्रेते सय्यद शमशोद्दीन यांनी दिली.

हेही वाचा;

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news