परभणी : आंतरराज्यीय सराईत गुन्हेगारास शस्त्रांसह अटक; २० गुन्ह्यांची उकल करण्यात गुन्हे शाखेला यश | पुढारी

परभणी : आंतरराज्यीय सराईत गुन्हेगारास शस्त्रांसह अटक; २० गुन्ह्यांची उकल करण्यात गुन्हे शाखेला यश

परभणी, पुढारी वृत्तसेवा : राज्यातील विविध जिल्हयांतून हायवा, टिप्पर व इतर चारचाकी वाहने चोरणार्‍या आंतरराज्यीय सराईत गुन्हेगारास पिस्तूल व जीवंत काडतूसासह अटक करण्यात परभणी पोलिसांच्या स्थानिक गुन्हा शाखेला यश आले असून त्याच्याकडून 20 गुन्हयांची उकल झाली आहे. यामुळे राज्यातील इतर जिल्हयातील बरेच गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्‍त केली आहे.

जिल्हयातील विविध तालुक्यांसह बीड, लातूर, हिंगोली, नांदेड हे चार जिल्हे व रायगड या जिल्हयातूनही मोठी वाहने चोरण्याचे प्रकार गेल्या काही महिन्यांमध्ये मोठया प्रमाणात घडले होते. यामध्ये हायवा, टिप्परसारखी चारचाकी वाहने चोरली गेली होती. विशेषत: जिल्हयात मानवत येथे चार गुन्हे, पालम, सेलू व पाथरी येथील पोलिस ठाण्यात प्रत्येकी एक गुन्हा या वाहनचोरी संदर्भात दाखल झाला होता. त्यामुळे जिल्हा पोलिस अधिक्षक रागसुधा आर., अप्पर पोलिस अधिक्षक यशवंत काळे यांनी या चोर्‍यांतील गुन्हयाच्या शोधासाठी गुन्हे शाखेचे फौजदार नागनाथ तुकडे, साईनाथ पुयड व मारोती चव्हाण या तीन अधिकार्‍यांच्या नेतृत्वात तीन पथके स्थापन केली होती.

या पथकांनी वाहन चोरीच्या गुन्ह्यांची उकल करताना अशाप्रकारचे गुन्हे करणारे रेकॉर्डवरील पाहिजे असलेल्या आरोपींचा शोध घेण्यास सुरूवात केली. त्यावेळी मानवत, सेलू व पाथरी हद्दीत गस्त घालीत असताना पाहिजे असलेला गुन्हेगार विष्णू रामभाऊ आकात (रा.सातोना,ता.परतूर) हा वाहनाने (क्रमांक एमएच 12 जीआर 9995) प्रवास करीत असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे फौजदार तुकडे, अंमलदार विलास सातपुते, रविकुमार जाधव, विष्णु चव्हाण, मधुकर ढवळे, निलेश परसोडे यांनी या मार्गावर ठाण मांडून हात दाखवत त्याचे वाहन थांबविण्याचा प्रयत्न केला मात्र ही बाब लक्षात आल्यानंतर त्याने वाहन भरधाव वेगावे चालवून मानवत तहसील कार्यालयाच्या पडीक शेतशिवारात घातले व वाहन सोडून पोलिसांना चकमा देत तो शिवारात दबा धरून बसला होता. त्याचवेळी गुन्हे शाखेच्या या पथकाने त्यास तहसीलच्या पाठीमागे दोन किमी अंतरावर शेतातून त्यास ताब्यात घेतले. त्याची सखोल चौकशी केली असता त्याने जिल्हयासह मराठवाडा व राज्यातील अन्य काही भागांतून आपल्या साथीदारांसह वाहने चोरी केल्याचे कबुल केले. एकुण 20 वाहन चोरीचे गुन्हे त्याने कबुल केले असून त्याने अवैधरित्या बाळगलेली एक पिस्टल दोन जीवंत राउंडसह आढळून आली ही त्याच्याकडून ताब्यात घेवून सेलू पोलिस ठण्यात विष्णू आकात यास हजर करण्यात आले.

Back to top button