

Youth fatally attacked with a cutter in Parbhani
परभणी, पुढारी वृत्तसेवा : शहरातील वांगी रोड येथील स्वच्छता कॉलनीत किरकोळ कारणावरून दोन तरुणांनी संगणमत करून एका २० वर्षीय तरुणावर कटरने जीवघेणा हल्ला केला. ही घटना मंगळवारी (दि.७) सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी नानलपेठ पोलीस ठाण्यात दोघांविरुध्द खुनाच्या प्रयत्नासह विविध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला.
सौरभ चांदू आराटे (वय २०, रा. स्वच्छता कॉलनी, वांगी रोड) हा दळण घेऊन घरी जात असताना आरोपी अजय कैलास जोगदंड आणि आकाश प्रकाश देशमुख यांनी त्याला विनाकारण धक्का दिला. सौरभने कारण विचारल्यावर दोघांनी मिळून त्याला पुन्हा धक्काबुक्की केली. दरम्यान, प्रकार पाहून सौरभचा भाऊ प्रदीप आराटे यांनी हस्तक्षेप केला असता, आरोपी अजय जोगदंड याने सौरभच्या गळ्यावर व उजव्या गालावर कटरने वार करत गंभीर जखमी केले.
तसेच, त्याच्या भावावरही गळा, हात, पाय व खांद्यावर कटरने वार करत जीवे मारण्याचा प्रयत्न केला. आरोपी आकाश देशमुख याने देखील लाथाबुक्क्यांनी मारहाण करत धमक्या दिल्या. याप्रकरणी नानलपेठ पोलीस ठाण्यात विविध कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहायक पोलीस निरीक्षक खजे हे करीत आहेत. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी डंबाळे यांच्यासह पोलिस निरीक्षक कदम व अन्य अधिकाऱ्यांनी भेट दिली.