

Gangaprasad Anerao as Shiv Sena district chief and Dr. Vivek Navandar as metropolitan chief
सुभाष कच्छवे
परभणी : गेल्या विधानसभा निवडणुकीपासून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या पक्षाचे जिल्हाप्रमुखपद रिक्तच होते. दोन्ही जिल्हाप्रमुखांच्या रिक्त जागा पक्षाने भरून काढल्या असून शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखपदी गंगाप्रसाद आणेराव तर महानगर प्रमुखपदी डॉ. विवेक नावंदर यांच्या नियुक्त्या पक्षाने जाहीर केल्या आहेत. आणेराव हे खा. संजय जाधव यांचे तर डॉ. विवेक नावंदर हे आ.डॉ. राहुल पाटील यांचे कट्टर समर्थक मानले जातात.
मातोश्रीने खासदार-आमदार समर्थकाला समान संधी देऊन समतोल साधल्याचे दिसून येत आहे. आणेराव यांच्याकडे परभणी, गंगाखेड या दोन विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली आहे. डॉ. विवेक नावंदर यांच्याकडे परभणी महानगरक्षेत्राची जबाबदारी देण्यात आली आहे.
पद फाटाफुटीच्या काळात सेनेचा हा बालेकिल्ला अभेद्य राहिला पण विधानसभा निवडणुकीपासून पक्षाचे संघटनात्मक असलेले जिल्हाप्रमुखपद रिक्त होते. शिवसेना उबाठा गटाचे तत्कालीन जिल्हा प्रमुख विशाल कदम यांनी विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर शिव सेना शिंदे गटाची वाट धरली होती. तर दुसरे जिल्हा प्रमुख संजय साडेगावकर यांनी विधानसभा निवडणुकीदरम्यान वंचित बहुजन आघाडीची कास धरली होती. काही महिन्यांपूर्वी शिवसेनेने जिल्हाप्रमुख आणि महिला आघाडी जिल्हा संघटकाची निवड केली होती.
या निवडीच्या वेळीही मातोश्रीने खासदार-आमदार दोघेही नाराज होऊ नयेत याची काळजी घेतली होती. खा. संजय जाधव यांचे समर्थक रवींद्र धर्मे यांना पाथरी-जिंतूर विधानसभा मतदार संघाची जबाबदारी देत त्यांच्याकडे जिल्हा प्रमुख पद सोपवले होते. आ.डॉ. राहुल पाटील यांच्या कट्टर समर्थक म्हणुन ओळखल्या जाणाऱ्या आंबीका डहाळे यांच्याकडे शिवसेना महिला आघाडीचे जिल्हा संघटक पद सोपवले होते. नविन नियुक्त्यांमध्येही मातोश्रीने समतोल साधला आहे. आणेरावांकडे जिल्हा प्रमुखपद देण्यात आल्यानंतर शिवसेनासह संपर्क प्रमुख डॉ. विवेक नावंदर यांच्याकडे परभणी शहर महानगराची जबाबदारी देण्यात आली आहे.
शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटामध्ये खासदार आणि आमदार समर्थक अशी विभागणी झाल्याचे स्पष्ट आहे. शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या परभणीमध्ये संघटनात्मक पातळीवर सारेकाही आलबेल नसल्याचे स्पष्ट असून संघटनेचे अहित होऊ नये अशी कडवट शिवसैनिकांची भावना आहे. आगामी महानगरपालिका व अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये एकाच पक्षाच्या दोन लोकप्रतिनिधींमध्ये एकजूट गरजेची असल्याची भावना काही शिवसैनिक बोलून दाखवत आहेत.
शिवसेनेचे संघटनात्मक काम पाहण्यासाठी व त्या कामावर नियंत्रण ठेवण्यासाठी, कार्यकर्त्यांसोबत समन्वय ठेवण्यासाठी जिल्ह्यासाठी संपर्कप्रमुख पद अशी शिवसेनेची रचना होती. दिवाकर रावतें सारख्या कुशल संघटकाने परभणी जिल्ह्यामध्ये शिवसेनेची पाळेमुळे रुजविण्यासाठी गाव, वाड्या वस्तीवर भटकंती करत शिवसेनेचे पक्ष संघटन मजबुत केले.
तदनंतर रवींद्र वायकर यांचा संपर्क प्रमुख पदाचा कार्यकाळही शिवसे नेच्या दृष्टीने चांगला राहिला होता. आजघडीला परभणी जिल्ह्यासाठी संपर्कप्रमुख नाही. विधान परिषदेचे माजी विर-ोधीपक्ष नेते आंबादास दानवे हे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी पदाधिकाऱ्यांशी समन्वय ठेवण्यासाठी शहरात येत असतात. जिल्ह्यात आजघडीला शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाकडे संपर्कप्रमुख पद नसल्याचे दिसून येते. यापुर्वी डॉ. विवेक नावंदर यांनी सहसंपर्कप्रमुख पदाची जबाबदारी सांभाळली आहे.