

पूर्णा : तालूक्यातील पांगरा लासीना शेशिवारात पुन्हा एकदा पिसाट हिंस्त्र कुत्र्यांच्या कळपाने हौदोस घालण्यास सुरुवात केली आहे. येथील शेतकरी दुलाजी व्यंकटी ढोणे यांच्या दोन मोठ्या लालकंधारी गायींचा ता.१० ऑगस्ट रविवार रोजी रात्री हिंस्त्र कुत्र्यांनी हल्ला चढवत लचके तोडून फडशा पाडल्याची घटना घडली आहे. त्याच बरोबर तेथीलच दत्ता पावडे यांच्या देखील तीन शेळ्यांचा फडशा पाडला.
या दोन्ही दुर्दैवी घटनेत दुलाजी ढोणे यांचे ८० हजार तर दत्ता पावडे या शेतकऱ्याचे ४५ हजार रुपयाचे आर्थिक नुकसान झाले आहे. या मोकाट कुत्र्यांनी या आधी देखील जवळपास ८ वासरांचा फडशा पाडला होता.यातील शेतकऱ्यांचे सुध्दा मोठे आर्थिक नुकसान झाले होते.दरम्यान,या भागात मागील काही दिवसापासून मोकाट मातून गेलेल्या कुत्र्यांनी उच्छाद मांडला असून ते जनावरावर तर हल्ला चढवून फडशा पाडतच आहेत शिवाय शाळकरी मुले यासह माणसांच्या अंगावरही धावून येताहेत. ह्या मातलेल्या हिंस्त्र कुत्र्यांच्या बंदोबस्त करण्यासाठी शेतकऱ्यांनी संबंधित प्रशासन व वनविभागास कळवले होते.
परंतू,वन विभागाने याकडे साफ दुर्लक्ष केल्यामुळे हे कुत्रे अधुनमधून पशूधनास कडाडून चावा घेत फडशा पाडत आहेत. यामुळे पशूपालक शेतकरी भयभीत झाले आहेत. पशूपालकांचे आर्थिक नुकसान होत आहे. याकडे आता जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी लक्ष घालून संबंधित खात्याला मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी कडक सुचना द्यावेत.अशी मागणी पशूपालक शेतकरी वर्गातून पुढे येत आहे.