

Purna Pimpala Lokhande dog attacks
पूर्णा : पूर्णा तालुक्यातील पिंपळा लोखंडे गावाच्या शिवारात मोकाट हिंस्त्र कुत्र्यांमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून कुत्र्यांनी शेतकऱ्यांच्या पशुधनावर सातत्याने हल्ले करण्याचा सपाटा लावला आहे.
गावालगतच्या शेत गट क्रमांक ५६ मधील आखाड्यावर बांधलेल्या दोन वर्षांच्या लालकंधारी वाणाच्या कालवडीवर कुत्र्यांनी आज (दि. २१) पहाटे चारच्या सुमारास हल्ला केला. या हल्ल्यात कालवडीच्या मस्तक, कान आणि पोटाचे लचके तोडून खाल्ले. सकाळी ही कालवड मृत अवस्थेत आढळून आली. या घटनेमुळे शेतकरी निवृत्ती नरवाडे यांचे सुमारे ३० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
या आधीही पांगरा येथील काही शेतकऱ्यांच्या कालवड व वासरांवर अशाच प्रकारे हल्ले झाले होते, ज्यात सात जनावरे मृत्युमुखी पडली होती. या मोकाट हिंस्त्र कुत्र्यांच्या कळपाने परिसरातील पशुधनावर हल्ले करून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे.
या गंभीर परिस्थितीबाबत शेतकरी आणि ग्रामस्थांनी वारंवार वनविभाग व पशुसंवर्धन विभागाला कळवले असतानाही अद्याप या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात आलेला नाही. परिणामी, शेतकरी हैराण झाले आहेत. वनविभागाच्या या अक्षम्य दुर्लक्षामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट पसरली असून तातडीने उपाययोजना न झाल्यास शेतकऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.