

परभणी : शहरातील वॉर्ड क्रमांक ३ मधील कुशीनगर, विकास भारती शाळा परिसर, साईबाबा नगर तसेच वांगी रोडलगतच्या रस्त्याची पावसामुळे अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल आणि पाणी साचल्याने नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले असून महापालिका प्रशासन व लोकप्रतिनिधींनी दिलेली आश्वासने केवळ कागदावरच राहिल्याने परिसरात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
सदर रस्त्याच्या दुरवस्थेबाबत काही दिवसांपूर्वी परिसरातील नागरिकांनी महापालिका आयुक्त व महापौर यांच्याकडे निवेदन देऊन तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली होती. निवेदनाची दखल घेत संबंधित अधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देत पाहणी केली होती. त्यावेळी दोन ते तीन दिवसांत रस्त्यावर मुरूम टाकून नागरिकांसाठी तात्पुरती वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, अनेक दिवस उलटूनही प्रशासनाकडून कोणतीही कार्यवाही झाली नाही.
दरम्यान, सततच्या पावसामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचून चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यामुळे शाळकरी विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, रुग्ण तसेच वाहनधारकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेक दुचाकीस्वार घसरून पडल्याच्या घटना घडत असून भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त होत आहे.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, प्रशासनाने पाहणी करून आश्वासने देण्यापलीकडे कोणतीही ठोस पावले उचललेली नाहीत. पावसाळा सुरू असताना नागरिकांना दिलासा मिळावा यासाठी रस्त्यावर मुरूम टाकून तात्पुरती दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी जोर धरत आहे. महापालिका प्रशासनाने आणखी एखादी दुर्घटना घडण्याची वाट न पाहता त्वरित दुरुस्तीचे काम हाती घ्यावे. तसेच कायमस्वरूपी दर्जेदार रस्ता उभारण्याचा आराखडा तयार करून नागरिकांना या समस्येतून मुक्त करावे, अशी मागणी परिसरातील रहिवाशांनी केली आहे.
आयुक्त व महापौरांना निवेदन दिल्यानंतर अधिकाऱ्यांनी पाहणी करून दोन-तीन दिवसांत मुरूम टाकण्याचे आश्वासन दिले होते. मात्र अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. पावसामुळे नागरिकांचे अतोनात हाल होत आहेत. प्रशासन व स्थानिक लोकप्रतिनिधींनी तातडीने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन नागरिकांची गैरसोय दूर करावी.
महेंद्र पगारे, रहिवासी, वॉर्ड क्रमांक ३