

Uddhav Thackeray's dialogue rally at Dhengali Pimpalgaon
सेलू, पुढारी वृत्तसेवा : राज्यातील शेतकऱ्यांवर अतिवृष्टीमुळे आलेले संकट गंभीर असून शासनाने जाहीर केलेली ३१ हजार कोटी रुपयांची मदत ही फसवी ठरली. शेतकऱ्यांना मदत न मिळाल्याने त्यांच्यावर अन्याय होत आहे. त्यामुळे हे फसवे सरकार झोपेतून जागे करण्यासाठी व सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी तुमच्या मनातील ठिणगी पेटवा, असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना केले.
तालुक्यातील ढेंगळी पिंपळगाव येथे शनिवारी (दि.८) आयोजित शेतकरी संवाद मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी माजी विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे, खा. चंद्रकांत खैरे, खा. संजय जाधव, आ.राहुल पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. ठाकरे म्हणाले, भाजप आणि मित्रपक्षांच्या सरकारमधील घोटाळे दिवसेंदिवस उघड होत आहेत. अजित पवार, राधाकृष्ण विखे, प्रताप सरनाईक यांसारखे मंत्री सर्वसामान्यांचा पैसा लुटत आहेत.
मात्र शेतकऱ्यांना मदत देताना हिम्मत दाखवत नाहीत. सरकार शेतकऱ्यांचा पंचनामा करत नसेल तर शेतकऱ्यांनीच सरकारचा पंचनामा करावा. कोरडवाहू शेतीसाठी १८ हजार ५००, बागायतीसाठी २७ हजार आणि बहुवार्षिक शेतीसाठी ३२ हजार ५०० रुपयांची मदत अपुरी असल्याचे सांगून, पंजाबप्रमाणे प्रति हेक्टर ५० हजार रुपये मदत देण्याची मागणी केली. शेतकऱ्यांना कर्जमाफी नव्हे तर कर्जमुक्ती हवी, कारण माफी गुन्हेगारांना दिली जाते आणि सगळे गुन्हेगार भाजपात आहेत, असे टोला त्यांनी लगावला. मेळाव्यात महिला शेतकरी अनिता सोळंके यांनी आपल्या व्यथा मांडताना सांगितले, शेतकरी असूनही आम्ही उपाशी आहोत.
शेतीत नुकसान झाले, दागिने गहाण ठेवून मुलींचे शिक्षण चालवावे लागते. शासनाने भीक नको, पण शेतमालाला योग्य भाव द्यावा. त्यांचे मनोगत ऐकताना उद्धव ठाकरे यांच्यासह उपस्थित नेत्यांचे डोळे पाणावले. त्यानंतर अंबादास दानवे यांनी सोळंके कुटुंबातील दोन मुलींचा शैक्षणिक खर्च शिवसेना उचलेल, अशी घोषणा केली. ठाकरे यांनीही निकाल लागल्यानंतर पेढे घेऊन या, पुढचे शिक्षण आमच्यावर असे सांगून आश्वासन दिले.
मुख्यमंत्री क्लीनचीटर
भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या प्रत्येक नेत्याला मुख्यमंत्री क्लीनचिट देत आहेत. त्यामुळे ते सध्या मुख्यमंत्री क्लीनचीटर झाले आहेत. तसेच लाडकी बहीण योजनेतून कलह निर्माण होत असून, सध्याचे गृहमंत्री हे गृहकलह मंत्री ठरल्याची टीका ठाकरे यांनी केली.