

Tired of harassment by superiors, municipal employee ends life
बीड, पुढारी वृत्तसेवा शहरातील नगरपालिका वसुली विभागात कार्यरत असलेल्या अविनाश धांडे (वय ४२) या कर्मचाऱ्याने थेट नगरपालिका इमारतीच्या टेरेसवर गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी रात्री समोर आली. प्रशासनातील दबाव, वरिष्ठांचा त्रास आणि कार्यालयीन ताणतणाव, या सगळ्यांचा विस्फोटच या कर्मचाऱ्याच्या टोकाच्या निर्णयातून झाला असल्याचे स्पष्ट होत आहे.
सर्वात गंभीर बाब म्हणजे धांडे यांनी आत्महत्येपूर्वी मोबाईलमधील : एका पमध्ये सुसाईड नोट लिहून ठेवली असून, त्यात त्यांनी वरिष्ठांकडून सातत्याने अडवणूक होत असल्याचा उल्लेख केला आहे. तसेच कुटुंबीयांसाठी भावनिक संदेशही त्यांनी लिहिला आहे.
अविनाश धांडे हे गेल्या काही वर्षांपासून वसुली विभागात कार्यरत होते. आपल्या कामात प्रामाणिक असलेले हे अधिकारी, कार्यालयीन तणाव आणि अन्यायकारक वर्तणुकीला कंटाळून शेवटचा मार्ग निवडावा लागल्याची चर्चा कर्मचाऱ्यांमध्ये आहे. दरम्यान, या घटनेची नोंद अद्याप बीड शहर पोलिस ठाण्यात झालेली नसली तरी, व्यवस्थेतील अन्याय, वरिष्ठांचा मानसिक छळ आणि वाढता कामाचा दबाव यामुळे आणखी किती जण असे बळी जातील, हा प्रश्न उपस्थित झाला आहे.
कर्मचाऱ्यांच्या भावनांचा आणि मानसिक आरोग्याचा विचार न करणाऱ्या शासकीय व्यवस्थेच्या बेफिकीरीवर या घटनेने पुन्हा एकदा बोट ठेवले आहे. अविनाश धांडे यांचा मृत्यू हा केवळ आत्महत्या नाही तर या व्यवस्थेच्या निर्दयतेविरुद्धचा मूक संताप आहे. दरम्यान या संबंधी कुटुंबीयांनी देखील या आत्महत्येची संपूर्ण चौकशी झाली पाहिजे अशी मागणी केली असून सुसाईड नोट मध्ये ज्यांची नवे आहेत त्या सर्वांची चौकशी करावी असेही त्यांनी म्हटले आहे.