

मानवत, पुढारी वृत्तसेवा: शहरासह परिसरात गुन्हेगारी कृत्यांमुळे दहशत निर्माण करणाऱ्या टोळीवर पोलिसांनी मोठी कारवाई करत टोळी प्रमुखासह सदस्यांना जिल्हाबाहेर हद्दपार करण्याचा आदेश दिला. पोलिस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांच्या कार्यालयाने हा अंतिम आदेश जारी केला आहे.
हद्दपार केलेल्या संबंधित टोळीवर चोरी, दरोडा, धमकी, मारहाण तसेच सार्वजनिक शांततेला बाधा आणणाऱ्या विविध गुन्ह्यांची नोंद आहे. शहरासह परिसरात सतत गुन्-हेगारी कारवाया करून नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण केल्याचे निष्पन्न झाले आहे.
या प्रकरणात श्रावणअण्णा काकडे, पांडू गुलाब काकडे, संतोष सचिन पवार व विशाल अमरसिंग ठाकूर यांच्याविरुध्द विविध पोलिस ठाण्यांत गुन्हे दाखल असून, त्यांच्या गुन्हेगारी पाश्र्वभूमीचा आढावा घेतल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. पोलिसांच्या नोंदीनुसार या टोळीतील सदस्यांनी मानवत व आसपासच्या भागात शेतीमाल चोरी, मारहाण, धमक्या व अन्य गंभीर गुन्हे करत कायदा व सुव्यवस्थेला आव्हान दिले होते.
वारंवार कारवाई करूनही त्यांच्यात सुधारणा दिसून न आल्याने अखेर कठोर पाऊल उचलण्यात आले. पोलिस अधीक्षक परदेशी यांनी महार- ाष्ट्र पोलिस कायदा कलम ५५ अंतर्गत अधिकार वापरून संबंधित आरोपींना निर्धारित कालावधीसाठी परभणी जिल्ह्याबाहेर हद्दपार करण्याचा आदेश दिला. आदेशानुसार संबंधितांनी ठराविक कालावधीत जिल्ह्याबाहेर निघून जाणे बंधनकारक राहणार आहे. तसेच आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.