Parbhani Crime News: दहशत माजवणाऱ्या दोन टोळ्या जिल्ह्यातून हद्दपार

परभणी जिल्हा पोलीस अधीक्षकांची कडक कारवाई
Parbhani Crime
Parbhani CrimePudhari
Published on
Updated on

मानवत : मानवत शहर व परिसरात गुन्हेगारी कृत्यांमुळे दहशत निर्माण करणाऱ्या दोन टोळ्यांविरोधात पोलिसांनी मोठी कारवाई करत टोळीप्रमुखांसह सदस्यांना जिल्ह्याबाहेर हद्दपार करण्याचा आदेश जारी केला आहे. हा अंतिम आदेश परभणी जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांच्या कार्यालयातून देण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित टोळ्यांवर चोरी, दरोडा, धमकी, मारहाण तसेच सार्वजनिक शांततेला बाधा आणणाऱ्या विविध गुन्ह्यांची नोंद आहे. मानवत शहरासह परिसरात सातत्याने गुन्हेगारी कारवाया करून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणात श्रावण अण्णा काकडे, पांडू गुलाब काकडे, संतोष सचिन पवार आणि विशाल अमरसिंग ठाकूर यांच्याविरुद्ध विविध पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल आहेत. त्यांच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीचा सखोल आढावा घेतल्यानंतर ही कठोर कारवाई करण्यात आली.

पोलिसांच्या नोंदीनुसार, या टोळीतील सदस्यांनी मानवत व परिसरात शेतीमाल चोरी, मारहाण, धमक्या व अन्य गंभीर गुन्हे करून कायदा व सुव्यवस्थेला आव्हान दिले होते. वारंवार कारवाई करूनही त्यांच्यात सुधारणा न झाल्याने अखेर हद्दपारीचा निर्णय घेण्यात आला.

हद्दपारीचा आदेश :
महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ अंतर्गत अधिकारांचा वापर करून पोलिस अधीक्षकांनी संबंधित आरोपींना ठराविक कालावधीसाठी परभणी जिल्ह्याबाहेर हद्दपार करण्याचे आदेश दिले आहेत. आदेशानुसार, संबंधितांनी निर्दिष्ट कालावधीत जिल्हा सोडणे बंधनकारक राहणार आहे. आदेशाचे उल्लंघन केल्यास कडक कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

मानवत परिसरातील गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी पोलिसांनी उचललेले हे पाऊल महत्त्वाचे मानले जात असून, कायद्याचा धाक निर्माण करण्यासाठी प्रशासनाचा हा ठोस संदेश असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news