

परभणी : मराठवाड्याच्या मातीत रुजलेला आणि महाराष्ट्राच्या पारंपरिक पशुधन संस्कृतीचा अभिमान मानला जाणारा लाल कंधारी गोवंश पुन्हा एकदा चर्चेत आला. परभणी येथील महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठांतर्गत कार्यरत पशुवैद्यकीय व पशुविज्ञान महाविद्यालयाच्या लाल कंधारी संशोधन व प्रात्यक्षिक प्रक्षेत्रावर एका लाल कंधारी गायीने निरोगी जुळ्या मादी कालवडींना जन्म दिल्याची दुर्मीळ घटना घडली असून, देशी गोवंश संवर्धन क्षेत्रासाठी हा अत्यंत महत्त्वाचा आणि आशादायी टप्पा मानला जात आहे.
देशी गाईमध्ये जुळ्या पिल्लांचा जन्म होणे हेच अत्यंत कमी प्रमाणात आढळणारे असताना, त्यातही जुळ्या मादी कालवडींचा जन्म होणे ही संशोधकांसाठी अभ्यासाची आणि पशुपालकांसाठी अभिमानाची बाब ठरत आहे. या घटनेमुळे लाल कंधारी जातीच्या आनुवंशिक क्षमतेबाबत नव्याने चर्चा सुरू झाली असून, देशी गोवंश संवर्धनाच्या प्रयत्नांना नवी दिशा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
महाविद्यालय प्रशासनाने माहितीनुसार, ही प्रसूती अत्यंत सुरक्षित पार पडल्यानंतर माता गाय व दोन्ही कालवडी पूर्णतः निरोगी, सक्रिय आणि सक्षम असल्याचे स्पष्ट केले. सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्राणेश येवतीकर यांच्या मार्गदर्शनात प्रजनन तज्ज्ञ डॉ. बी. एल. कुमावत, प्रक्षेत्र संशोधन उपसंचालक डॉ.बी.एस.कातकडे, डॉ. कटकुरी, प्रक्षेत्रावरील अनुभवी कर्मचाऱ्यांनी दक्षतेने प्रसूती व्यवस्थापन केले.
गायींमध्ये जुळ्या पिल्लांचा जन्म साधारणतः एक ते पाच टक्के इतक्या प्रमाणात आढळतो. विदेशी व संकरित जातींत हे प्रमाण तुलनेने अधिक असले तरी देशी गोवंशीयमध्ये ते अत्यल्प असते. यामुळे लाल कंधारीसारख्या स्थानिक व संवर्धन दृष्टीने महत्त्वाच्या जातीत जुळ्या मादी कालवडींचा जन्म जैविक दुर्मीळपणा नसून अनुवंशिक संशोधनासाठी महत्त्वपूर्ण घटक मानला जातो. विशेष म्हणजे, मिश्रलिंगी जुळ्या पिल्लांमध्ये ‘फ्रीमार्टिन’सारख्या प्रजननविषयक गुंतागुंती निर्माण होण्याची शक्यता असते.
अशा परिस्थितीत मादी वासराची प्रजनन क्षमता बाधित होऊ शकते. दोन्ही कालवडी मादी असल्याने त्यांची भविष्यातील प्रजनन क्षमता सामान्य राहण्याची शक्यता अधिक असल्याचे पशुवैद्यकीय तज्ज्ञांनी म्हटलेे. याबद्दल महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ कुलगुरू प्रा.डॉ.नितीन पाटील, शिक्षण संचालक डॉ.शिरीष उपाध्ये, संशोधन संचालक डॉ.नितीन कुरकुरे, विस्तार शिक्षण संचालक डॉ.स.वा.बोंडे यांनी सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्राणेश येवतीकर, प्रजनन तज्ज्ञ डॉ. बी.एल.कुमावत, डॉ.बी.एस.कातकडे, डॉ. कटकुरी, कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.
लाल कंधारी : मराठवाड्याच्या मातीतला काटक वारसा
लाल कंधारी ही महाराष्ट्रातील विशेषतः मराठवाडा परिसरातील पारंपरिक देशी गोवंशीय जात आहे. तिच्या अंगकाठीतील मजबुती, लालसर रंग, उष्ण हवामानाशी जुळवून घेण्याची क्षमता, दुष्काळी परिस्थितीत टिकून राहण्याची ताकद आणि कमी चारा व संसाधनांमध्ये उत्पादनक्षम राहण्याची क्षमता यामुळे ही जात ग्रामीण भागात विशेष लोकप्रिय आहे. शेतीपूरक व्यवसाय म्हणून पशुपालन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी लाल कंधारी हा विश्वासार्ह पर्याय मानला जातो.
परभणीतील लाल कंधारी संशोधन व प्रात्यक्षिक प्रक्षेत्रावर अनेक वर्षांपासून देशी गोवंश संवर्धन, निवडक पैदास, शास्त्रीय संगोपन आणि ग्रामीण स्तरावरील जनजागृतीवर सातत्याने काम सुरू आहे. यातच लाल कंधारी गायीने दिलेला जुळ्या मादी कालवडींचा जन्म हा देशी गोवंश संवर्धन चळवळीसाठी प्रेरणादायी व सकारात्मक संकेत मानला जात आहे.