IIT Bombay antibiotic research : जुनी प्रतिजैविके पुन्हा प्रभावी करण्याचा नवा मार्ग

आयआयटी मुंबईचा मोठा शोध
IIT Bombay antibiotic research
IIT Bombay antibiotic research pudhari photo
Published on
Updated on

मुंबई : अनेक अँटिबायोटिक्स आता निष्प्रभ ठरत असल्याने आरोग्य क्षेत्रासमोर गंभीर संकट उभे राहिले आहे. एकेकाळी सहज बरे होणारे संसर्ग आज जीवघेणे ठरत आहेत, कारण अनेक जीवाणूंनी प्रतिजैविकांना प्रतिसाद देणे थांबवले आहे. अशा परिस्थितीत आयआयटी मुंबईतील संशोधकांनी जुनीच प्रतिजैविके पुन्हा प्रभावी करण्याचा नवा आशादायी मार्ग शोधून काढला आहे.

डीएनए-आधारित ॲप्टामर आणि लिपोसोम तंत्रज्ञानाचा वापर करून प्रतिरोधक जीवाणूंना पुन्हा औषधांना प्रतिसाद द्यायला भाग पाडण्याचा हा अभिनव प्रयोग आहे. भविष्यात ही पद्धत यशस्वी ठरल्यास, नवीन औषधांच्या शोधावर अवलंबून न राहता, विद्यमान औषधांनाच नव्या ताकदीने वापरणे शक्य होणार आहे.

IIT Bombay antibiotic research
Bio Waste to Fuel | जैविक कचर्‍यातून इंधननिर्मिती

न्यूमोनिया, क्षयरोग, रक्तातील संसर्ग, मूत्रमार्गात संसर्ग अशा अनेक आजारांवर उपचार करताना डॉक्टरांना अडचणी येत आहेत. कारण प्रतिजैविकांचा दीर्घकाळ व अनेकदा अनियंत्रित वापर झाल्याने जीवाणूंनी त्यांच्याविरोधात संरक्षण यंत्रणा विकसित केली आहे.

जागतिक पातळीवरही ही समस्या झपाट्याने वाढत असून, अनेक क्लिनिकल लॅबमध्ये जीवाणू औषधांना प्रतिसाद देत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. याच पार्श्वभूमीवर आयआयटी मुंबईच्या रसायनशास्त्र विभागातील प्रा. रुची आनंद आणि प्रा. पी. आय. प्रदीपकुमार यांच्या नेतृत्वाखालील संशोधकांनी वेगळा दृष्टिकोन स्वीकारला.

नवीन प्रतिजैविके शोधण्याऐवजी, आधीपासून उपलब्ध असलेल्या औषधांची कार्यक्षमता पुन्हा कशी वाढवता येईल, यावर त्यांनी लक्ष केंद्रित केले. या संशोधनात ‌‘डीएनए ॲप्टामर्स‌’ या संकल्पनेचा वापर करण्यात आला आहे. हे ॲप्टामर्स म्हणजे डीएनएच्या अतिशय लहान साखळ्या असून त्या विशिष्ट लक्ष्यावर अचूकपणे कार्य करतात.

सामान्यतः जीवाणू प्रतिजैविकांना निष्प्रभ करण्यासाठी ‌‘ईआरएम‌’सारखी विकरे (एन्झाइम्स) तयार करतात. ही विकरे रायबोझोममध्ये सूक्ष्म बदल घडवून आणतात आणि त्यामुळे औषध योग्य ठिकाणी बांधले जात नाही. परिणामी, औषधाचा परिणाम होत नाही. मात्र, या संशोधनातून विकसित करण्यात आलेल्या ॲप्टामर्स या विकरांनाच अडवतात. म्हणजेच, जीवाणूंची प्रतिकार यंत्रणा थेट निष्क्रिय केली जाते. त्यामुळे प्रतिजैविक पुन्हा आपल्या मूळ पद्धतीने काम करू लागते.

ॲप्टामर्स जीवाणूंपर्यंत प्रभावीपणे कसे पोहोचवायचे? यासाठी त्यांनी ‌‘लिपोसोम-आधारित वितरण प्रणाली‌’ विकसित केली. लिपोसोम हे सूक्ष्म, बुडबुड्यासारखे कण असून त्यांची रचना पेशींच्या आवरणासारखी असते. त्यामुळे ते सहजपणे पेशींमध्ये प्रवेश करू शकतात. या पद्धतीचा वापर केल्यावर ॲप्टामर्सचे जीवाणूंमध्ये शोषण 90 टक्क्यांहून अधिक वाढल्याचे आढळले. याउलट, स्वतंत्रपणे दिल्यास त्यांचे शोषण अत्यल्प होते. विशेष म्हणजे, प्रतिजैविक-रोधक ‌‘स्टॅफिलोकोकस ऑरियस‌’ या जीवाणूवर केलेल्या प्रयोगांमध्ये या तंत्रामुळे औषधांची परिणामकारकता लक्षणीयरीत्या वाढल्याचे दिसून आले.

IIT Bombay antibiotic research
ग्लोबल वॉर्मिंग आणि वाहतुकीची साधने

या संशोधनात लीना लक्ष्मीकांत बडगुजर, दामिनी साहू, स्वागता पात्र, प्रा. पी. आय. प्रदीपकुमार आणि प्रा. रुची आनंद यांचा समावेश असलेल्या पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. नवीन औषध विकसित करणे ही दीर्घकालीन आणि खर्चिक प्रक्रिया आहे. त्याउलट, आधीपासून वापरात असलेल्या औषधांमध्ये सुधारणा करणे अधिक सोपे आणि व्यावहारिक ठरू शकते. मात्र, ही पद्धत प्रत्यक्ष उपचारांमध्ये वापरण्यापूर्वी प्राण्यांवरील आणि मानवी चाचण्या आवश्यक आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

एकूणच, अँटिबायोटिक प्रतिकाराच्या वाढत्या संकटावर मात करण्यासाठी हे संशोधन महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. भविष्यात या तंत्रज्ञानाचा यशस्वी वापर झाला, तर वैद्यकीय क्षेत्रात मोठा बदल घडू शकतो आणि अनेक जीव वाचवण्यास मदत होऊ शकते.

अधिक सखोल अभ्यासाची आवश्यकता

ॲप्टामर्सची शरीरातील इतर प्रथिनांशी होणारी संभाव्य प्रतिक्रिया, लिपोसोमची सुरक्षितता आणि दीर्घकालीन परिणाम यांचा सखोल अभ्यास करणे आवश्यक आहे. प्राण्यांवरील चाचण्या आणि फार्माकोकायनेटिक विश्लेषणानंतरच या तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष वैद्यकीय वापर शक्य होईल. तरीही, या संशोधनामुळे औषध-प्रतिरोधाच्या समस्येवर मात करण्यासाठी नवा मार्ग खुला झाला आहे. या तंत्रज्ञानाच्या भविष्यातील वापरासाठी अजून काही महत्त्वाच्या बाबींचे मूल्यमापन आवश्यक असल्याचे प्रा. प्रदीपकुमार यांनी नमूद केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news