

गेवराईः कुठलेही टेंडर नसताना खुलेआम सुरू असलेल्या अवैध वाळू उपशाकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले असतानाच, वाळूमाफियांकडून लाच मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी गेवराई पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस हवालदार विजय आघाव यांना बीड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शनिवारी (दि. ८ नोव्हेंबर) २० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले.
मिळालेल्या माहितीनुसार, गेवराई पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या वाळू चोरीच्या गुन्ह्यात आरोपी वाळू माफियाला सहकार्य करण्यासाठी हवालदार आघाव यांनी ३० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तडजोडअंती २० हजार रुपयांवर व्यवहार ठरला. याबाबतची माहिती बीड येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला मिळताच, उपअधीक्षक सोपान चिटमपल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सापळा रचला आणि हवालदार आघाव यांना लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. या कारवाईमुळे पोलिस विभागात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, संबंधित घटनेबाबत पुढील तपास सुरू असून, गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.