Parbhani News: गोठ्यातील गाई-म्हशींवर गुंडांचा राक्षसी हल्ला; डोळ्यात, गुप्तांगात लोखंडी रॉड खुपसले; दोन जनावरांचा मृत्यू 

पूर्णा तालुक्यातील पांगरा-बरबडी शिवरस्तालगत असलेल्या गोठ्यावर राक्षसी वृत्तीच्या अज्ञात गुंडांनी लोखंडी रॉड, कोयते व चाकू यांसारख्या शस्त्रांनी दुभत्या पशूधनावर भयंकर हल्ला केला.
cattle buffaloes attacked purna parbhani
cattle buffaloes attacked purna parbhaniFile Photo
Published on: 
Updated on: 

Parbhani News

पूर्णा: आनंद ढोणे

पूर्णा तालुक्यातील पांगरा-बरबडी शिवरस्तालगत असलेल्या गट क्र. २६१ मधील शेत आखाड्यावर दिनांक २४ ऑक्टोबर रोजी रात्री राक्षसी वृत्तीच्या अज्ञात गुंडांनी लोखंडी रॉड, कोयते व चाकू यांसारख्या शस्त्रांनी दुभत्या पशूधनावर भयंकर हल्ला केला. या दुर्घटनेत शेतकरी आनंदा नागोराव ढोणे यांच्या दोन जणावरांचा मृत्यू झाला.

या दोन जनावरांच्या डोक्यात लोखंडी रॉड घातले व गुप्तांगात लोखंडी रॉड घुपसल्याने ते मरण पावले. त्याचबरोबर गोठ्यात बांधलेल्या दुभत्या म्हशी व गायींच्या गुप्तांगात आणि डोळ्यात लोखंडी रॉड घालून त्यांना गंभीर जखमी केले आहे. शिवाय, शेतकरी गोविंद भाऊराव ढोणे यांच्याही दुभत्या म्हशीवर धारदार चाकूने वार करून शेपूट तोडून टाकली; तसेच पाठीवर वार करून तिला रक्तबंबाळ केले आणि अंगात लोखंडी रॉड घालून गंभीर जखमी केले. या दुर्घटनेत शेतकऱ्यांचे सुमारे १० लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाले असून, जणावरांना पाहून शेतकऱ्यांनी हांबरडा फोडला.

cattle buffaloes attacked purna parbhani
Parbhani News | बरबडी शिवारात स्फोटक साठा; पांगरा येथील शेतकऱ्याचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

याबाबत अधिक माहिती अशी की, पूर्णा तालुक्यातील पांगरा येथील अल्पभूधारक शेतकरी आनंदा नागोराव ढोणे व गोविंद भाऊराव ढोणे यांची बरबडी-पांगरा शिवरस्त्यालगत पांगरा शिवारात गट क्र. २६१ मध्ये शेतजमीन आहे. येथे दोन्ही शेतकऱ्यांचे गोठे आहेत. यापैकी आनंदा ढोणे हे मागील अनेक वर्षांपासून शेतीपूरक दुग्धव्यवसाय करतात. त्यांची मुले इंजिनिअरिंगचे उच्च शिक्षण घेत असल्यामुळे त्यांच्या शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी ते रात्रंदिवस मेहनत घेऊन दूध व्यवसाय करतात.

२४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी दूध काढून ते घराकडे गेले होते. रात्री आखाड्यावर कोणीही नसल्याची संधी साधून अज्ञात गुंडप्रवृत्तीच्या टोळक्यांनी त्यांच्या आखाड्यावरील पशूधनावर लोखंडी शस्त्रांच्या साहाय्याने हल्ला केला. यात दोन जनावरे दगावली, तर अन्य जनावरांवर क्रूरपणे हल्ला करून त्यांना गंभीर जखमी करण्यात आले. सदर हल्ला झाल्यानंतर पहाटे एका शेजाऱ्याने त्यांना ही घटना कळवली. त्यानंतर आनंदा ढोणे, कल्याणराव ढोणे, गोविंद ढोणे व कैलास ढोणे यांनी आपला आखाडा गाठला. तेव्हा तिथे पशूधनावर लोखंडी शस्त्राने घातलेला हा विचित्र प्रकार पाहून ते चक्रावून गेले. "आमच्या मुक्या अन् निष्पाप दुभत्या जनावरांवर कोणी आणि कशामुळे असा हल्ला केला?" असे म्हणत ते ओक्साबोक्शी रडू लागले.

या घटनेची माहिती उपोविपोअ कुंदनकुमार वाघमारे आणि चुडावा-पूर्णा पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे. याची माहिती मिळताच घटनास्थळी शेतकऱ्यांनी गर्दी केली होती. प्रसंगी, मुक्या जनावरांवर झालेला राक्षसी हल्ला पाहून तेथे उपस्थित नागरिकांचे मन हेलावून गेले होते. सर्व शेतकऱ्यांमधून, हल्ला करणाऱ्या अज्ञात हल्लेखोरांचा तात्काळ तपास लावून त्यांना जेरबंद करावे, अशी मागणी पोलीस प्रशासनाकडे करण्यात आली आहे.

आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांचे पोलीस प्रशासनाला आदेश

दरम्यान, सदर मुक्या पशूधनावर क्रूर व राक्षसी पद्धतीने हल्ला केल्याची गंभीर घटना सरपंच उत्तमराव ढोणे-पाटील यांनी आमदार डॉ. गुट्टे यांना कळवली. त्यानुसार आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांनी तात्काळ संबंधित पोलीस धिकाऱ्यांशी संवाद साधून घटनेचा त्वरित तपास लावावा आणि शेतकऱ्यांना न्याय द्यावा, असे आदेश दिल्‍याची माहिती समोर आली आहे.

cattle buffaloes attacked purna parbhani
Parbhani Agriculture News : घटातील धान्‍याने रब्‍बी हंगामात पिकांच्‍या आशा पल्‍लवित

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news