Parbhani Agriculture News : घटातील धान्‍याने रब्‍बी हंगामात पिकांच्‍या आशा पल्‍लवित

पावसाच्‍या दीर्घ खंडामुळे खरिपाने दिला दगा; दुष्काळाच्‍या सावटात बळीराजाला हिरवाईची आस
Ghatsthapana Grain Growth
Ghatsthapana Grain Growthpudhari photo
Published on: 
Updated on: 

सेलू, श्रीपाद कुलकर्णी : नवरात्रोत्सवानिमित्त घराघरांत तसेच सार्वजनिक मंडळांत विधिवत घटस्थापना करण्यात आली. घटामध्ये पेरलेले धान्य दहा दिवसांत जोमाने उगवून बहरल्याने दुष्काळाच्या झळा सोसणार्‍या शेतकर्‍यांच्या रब्बी हंगामाच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या. घटातील धान्याची चांगली वाढ म्हणजे आगामी काळात पाऊस पडून रब्बी हंगाम बहरण्याची चाहूल असल्याची भावना ग्रामीण भागात व्यक्त होत आहे.

यंदा खरीप हंगामाच्या सुरुवातीला पाऊस झाल्याने शेतकर्‍यांनी मोठ्या अपेक्षेने पेरणी केली. पिकांची उगवणही चांगली झाली. त्यामुळे उत्पादन चांगले मिळेल, या आशेने शेतकर्‍यांनी आंतर मशागत, रासायनिक खते, कीडनाशकांच्या फवारण्या यासाठी मोठा खर्च केला. मात्र, त्यानंतर पावसाने दडी मारल्याने हातातोंडाशी आलेली पिके करपली.

Ghatsthapana Grain Growth
Marigold Farmers Losses : झेंडू उत्पादकांना दुष्काळात तेरावा महिना

अनेक भागांत खरीप उत्पादनावर मोठा परिणाम झाला असून शेतकर्‍यांसमोर आर्थिक संकट उभे राहिले. खरिपाचे पीक हातचे गेल्याने आता शेतकर्‍यांच्या नजरा रब्बी हंगामाकडे लागल्या. पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चार्‍याचा प्रश्नही गंभीर बनला. खरीप हंगामात झालेला खर्च वाया गेल्याने रब्बीच्या पेरणीसाठी भांडवल उभे करण्याचे आव्हानही शेतकर्‍यांसमोर आहे. अशा परिस्थितीत रब्बी पिकांना पावसाची साथ मिळावी, एवढीच अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत.

कृषिप्रधान ग्रामीण अर्थव्यवस्थेत रब्बी हंगामाला पूर्वीपासूनच विशेष महत्त्व आहे. खरीप हंगामातील उत्पादनातून आर्थिक गरजा भागविण्याचा प्रयत्न केला जातो, तर रब्बी हंगामातील ज्वारी, गहू, हरभरा आदी पिकांमुळे कुटुंबाच्या अन्नधान्याची गरज भागते. जनावरांसाठी चारा उपलब्ध होण्यासही रब्बीचा मोठा हातभार लागतो. त्यामुळे पूर्वीपासून रब्बीच्या पेरणीला मोठी पेरणी असे संबोधले जाते.

Ghatsthapana Grain Growth
Jalna Accident : शेगाव-पंढरपूर महामार्गावर बस-दुचाकीची धडक

खरीप हंगामातील नुकसान भरून काढणे सध्या शेतकर्‍यांना कठीण आहे. मात्र, रब्बीला पावसाची साथ मिळाली आणि पिके बहरली तर कुटुंबाच्या अन्नधान्याबरोबरच जनावरांच्या चार्‍याचा प्रश्न काही प्रमाणात सुटू शकतो. त्यामुळे घटातील धान्याप्रमाणेच रब्बीच्या शेतातही हिरवाई फुलावी आणि दुष्काळाचे सावट दूर व्हावे, यासाठी शेतकर्‍यांनी जगदंबेच्या चरणी प्रार्थना केली आहे.

१९७२च्‍या दुष्काळाच्‍या आठवणी जाग्‍या

यंदाच्या परिस्थितीची तुलना ज्येष्ठ शेतकरी १९७२ च्या भीषण दुष्काळाशी करीत आहेत. त्या काळात अन्नधान्याची तीव्र टंचाई निर्माण झाली होती. मात्र, त्यानंतर रब्बी हंगामाला पावसाची साथ मिळाल्याने पिके जोमात आल्याच्या आठवणी जुने शेतकरी सांगतात. त्यामुळे यंदाही खरीप हंगामाने निराश केले असले तरी रब्बी हंगाम शेतकर्‍यांना तारेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे. घटामध्ये पेरलेल्या धान्याची झालेली जोमदार वाढ सध्या ग्रामीण भागात चर्चेचा विषय ठरली आहे. पारंपरिक समजुतीनुसार घटातील धान्य चांगले उगवले तर पुढील हंगामासाठी ते शुभ संकेत मानले जातात. वैज्ञानिकदृष्ट्या घटातील धान्याच्या वाढीवरून पावसाचा अंदाज बांधता येत नसला, तरी संकटात सापडलेल्या शेतकर्‍यांसाठी ही हिरवी पालवी आशेचा आधार ठरत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news