

पूर्णा : तालुक्यातील कावलगाववाडी शिवारात गोदा नदीवर बागायती पिकांच्या सिंचनासाठी बसवलेल्या वीज मोटारींच्या केबल वायर व स्टार्टर अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची धक्कादायक घटना रविवारी (दि.14) मध्यरात्री घडली. यात सुमारे 75 ते 80 शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान झाले आहे.
कावलगाववाडी गावालगतच्या गोदावरी नदीवर ऊस, केळी, हळद, कापूस व इतर बागायती पिकांसाठी मोठ्या प्रमाणात विद्युत मोटारी बसविण्यात आल्या. या मोटारींतून पाईपलाईनद्वारे शेतात पाणीपुरवठा केला जातो. मात्र रविवारी मध्यरात्री अज्ञातांच्या टोळीने प्रथम किटकॅट काढून कटर मशीन सहाय्याने मोटारींच्या केबल वायर कापून जमा केल्या. नंतर मोटारींचे स्टार्टरही चोरून नेले.
ही घटना सोमवारी (दि.15) सकाळी शेतकरी शेतात गेले असता उघडकीस आली. मोटारी निकामी झाल्याचे लक्षात येताच शेतकऱ्यांनी परिसरात पाहणी केली असता सर्वत्र केबल वायर कापलेली व स्टार्टर गायब असल्याचे दिसले. यानंतर तत्काळ चुडावा पोलिस ठाण्यात घटनेची माहिती दिली. विशेष म्हणजे याच भागात यापूर्वीही 10 दिवसांपूर्वी अजदापूर येथील पूर्णा नदीवर बसविलेल्या विद्युत मोटारींच्या केबल वायरची चोरी झाली होती. त्या प्रकरणातील चोरट्यांचा अद्याप तपास लागलेला नसताना पुन्हा कावलगाववाडी येथे मोठ्या प्रमाणात चोरी झाल्याने संघटित टोळी सक्रिय असल्याचा संशय शेतकऱ्यांनी व्यक्त केला.
या चोरी प्रकरणी लहू शेळके, भुजंग राहटकर, डॉ.लक्ष्मण शेळके, विश्वनाथ शेळके, किशनराव हुलसुरे, प्रभाकर डाके, मंगेश गोविंदपुरे, गंगाधर गोविंदपुरे, मारोती शेळके, मारोती डाके, माधवराव हिंगमिरे, शंकर हिंगमिरे, तातेराव शेळके, विठ्ठल राहटकर, संगमनाथ हुलसुरे, ग्यानोजी हुलसुरे, हरीभाऊ हुलसुरे, प्रल्हाद शेळके, तुकाराम शेळके, आनंदा शेळके, होनाजी शेळके, दत्ता डाके, धुराजी डाके, ज्ञानेश्वर, गुनाजी शेळके, अशोक, नरहरी, रामदास शेळके यांच्यासह अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले.
चोरीनंतर पोलिस घटनास्थळी येऊन केवळ चौकशी करून जात असल्याचा आरोप शेतकरी करत आहेत. आम्ही तपास करीत आहोत, एवढेच सांगितले जात असून प्रत्यक्षात चोरट्यांचा माग कसा लागत नाही, असा सवाल शेतकरी उपस्थित करीत आहेत. विद्युत मोटारींचे वायर, स्टार्टर व इतर साहित्य चोरून काळ्या बाजारात विक्री करणारी टोळी सक्रिय असून त्यांच्यावर तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. या चोरीमुळे बागायती पिकांचे सिंचन ठप्प झाले, आगामी काळात पिके वाळण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली. संबंधित चोरट्यांचा तत्काळ शोध घेऊन त्यांना जेरबंद करावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही शेतकऱ्यांनी दिला आहे.