

आखाडा बाळापूर ः कळमनुरी तालुक्यातील पोतरा शिवारात दोन शेळ्या, एका वासराची शिकार केलेल्या बिबट्याचा चौथ्या दिवशी याच भागात वावर असल्याचे दिसून आले असून या ठिकाणी एका कुत्र्याची शिकार केल्याचे सोमवारी सकाळी स्पष्ट झाले. तर ट्रॅप कॅमेऱ्यामध्ये दोन बिबटे आल्याचे दिसून आले मात्र ते पिंजऱ्यात गेलेच नाहीत. आता त्यांना पिंजऱ्यात जेरबंद करण्यासाठी वन विभागाने आणखी दोन शेळ्या पिंजऱ्यात बांधून ठेवण्याची तयारी चालवली आहे.
कळमनुरी तालुक्यातील पोतरा व तेलंगवाडी शिवारात बिबट्याचा वावर असल्याचे स्पष्ट झाले आहे. तेलंगवाडी शिवारात काशीराम मोदे यांच्या शेतातील दोन शेळ्यांचा फडशा पाडल्यानंतर सलग दुसऱ्या दिवशी शनिवारी बिबट्याने पोतरा शिवारातील गजानन पतंगे यांच्या शेतातील वासराची शिकार केली. त्यानंतर रविवारी एका कुत्र्याची शिकार केल्याचे दिसून आल्याचे वन विभागाच्या सूत्रांनी सांगितले.
विभागीय वन अधिकारी राजेंद्र नाळे, सहायक विभागीय वन अधिकारी सचिन माने, वन परिक्षेत्र अधिकारी मीनाक्षी पवार, वनपाल शिवाजी काळे, वनरक्षक सुधाकर कऱ्हाळे, खंडागळे, योगीता सहारे यांच्या पथकाने शेतकऱ्यांच्या मदतीने रविवारी पोतरा शिवारातील टेकड्यावर तीन पिंजरे बसविले आहेत. त्याच परिसरात सुमारे 15 ट्रॅप कॅमेरे बसविण्यात आले आहेत.
दरम्यान, या ठिकाणी दोन बिबटे आले असल्याचे ट्रॅप कॅमेऱ्यातून स्पष्ट झाले. दोन्ही बिबटे पिंजऱ्याच्या जवळ आले होते मात्र ते पिंजऱ्यात गेलेच नाहीत. त्यानंतर आता तिन्ही पिंजऱ्यामध्ये आणखी एक शेळी वाढविली जाणार असल्याचे वन विभागाच्या सूत्रांनी सांगितले.
पोतरा शिवारात मागील चार दिवसांपासून एकाच परिसरात बिबट्यांचा वावर असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे तीन पिंजरे पुरेसे आहेत. रविवारी रात्री दोन बिबटे आले होते मात्र ते पिंजऱ्यात गेले नाहीत. या बिबट्यांना जेरबंद करण्याचे वन विभागाचे युध्दपातळीवर प्रयत्न आहेत. दोन दिवसांत बिबटे जेरबंद होतील अशी अपेक्षा विभागीय वन अधिकारी राजेंद्र नाळे यांनी व्यक्त केली.