

The District Collector inspected the farm
परभणी, पुढारी वृत्तसेवा : शुक्रवार आणि शनिवारी जिल्हाभरात झालेल्या मुसळधार पावसामुळे व अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून मोठ्या कष्ठाने वाढविलेली पिके उद्ध्वस्त झाल्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा कोमलडून पडला आहे. जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी रविवारी पूर्णा तालुक्यातील अनेक गावांना प्रत्यक्ष भेटी देऊन शेतकऱ्यांच्या वेदनेवर फुंकर मारत प्रशासनाला तत्काळ नुकसानीचा अहवाल सादर करण्याचे आदेश देत शेतकऱ्यांना एक आश्वासक दिलासाही दिला आहे.
शुक्रवारी व शनिवारी तब्बल १२ महसूल मंडळांत अतिवृष्टी झाली. या अतिवृष्टीने शेतकरी कोलमडून पडला असून शेतात मोठ्या कष्टाने पिकवलेल्या पिकांची नासाडी होत अनेक पिके जमीनदोस्त झाली आहेत. मोठ्या प्रमाणात पिकांमध्ये पाणी साचले आहे. पूर्णा तालुक्यात ढगफुटीसदृश पाऊस झाला.
या शिवाय जिल्हाभरातील १२ महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचे कृषी अवजारेही पावसाच्या पाण्यात वाहून गेली आहेत. निसर्गाच्या अवकृपेने शेतकरी हवालदिल झाल्याचे चित्र जिल्हाभरात पहावयास मिळत आहे. शुक्रवार व शनिवारी झालेल्या पावसानंतर शेतशिवारात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले.
नुकसानीची पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे रविवारी थेट बांधावर पोहचले. शेतकऱ्यांशी संवाद साधत प्रशासनातील अधिकाऱ्यांना भरपाईचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. ज्या शेतकऱ्यांचे खरोखर नुकसान झाले आहे पंचनामे तत्काळ सादर करा, असे आदेशही दिले.