

Purna Jirofata incomplete bridge issue
पूर्णा: तालुक्यात गेल्या पाच दिवसांपासून मुसळधार पावसामुळे थुना नदीला पूर आला असून, माटेगावजवळील नदीवरील पूल अद्याप अपूर्ण असल्याने पूर्णा-झिरोफाटा हा मुख्य मार्ग मागील चार दिवसांपासून बंद आहे. या मार्गावरील वाहतूक ठप्प झाल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. प्रवासी, वाहनधारक आणि शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
पावसाळ्यापूर्वीच पूल पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत एका बीड जिल्ह्यातील कंत्राटदाराने घेतलेले हे बांधकाम मागील दोन-अडीच वर्षांपासून संथ गतीने सुरू आहे. कंत्राटदाराने वारंवार सूचना मिळूनही कामात दिरंगाई केली. त्यामुळे पूल वेळेत पूर्ण न झाल्याने, पावसाळ्यात नदीला पूर आल्यावर मार्ग पूर्णपणे बंद पडला.
ग्रामस्थांच्या मते, कंत्राटदाराने पूल वेळेत पूर्ण केला असता, आज ही परिस्थिती ओढवली नसती. सध्या पुलाचा स्लॅब पूर्ण झाला असून, दोन्ही बाजूंच्या भरावाचे काम पुढील दोन-तीन महिन्यांत पूर्ण होईल, असे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांनी सांगितले आहे. मात्र, तोपर्यंत वाहतुकीचा प्रश्न गंभीरच राहणार आहे.
या परिस्थितीकडे जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष देण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. पूरस्थिती आणि रखडलेले पूल बांधकाम यामुळे संपूर्ण परिसरातील दळणवळण ठप्प झाले असून, नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे.