

जिंतूर : तालुक्यातील येलदरी पाटबंधारे प्रकल्पातील जलाशयात पावसामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक वाढली. त्यामुळे सोमवारी (दि.१८) सकाळी ७ वाजून ४५ मिनिटांनी येलदरी धरणाचे एकूण १० दरवाजे अर्धा मीटरने उघडण्यात आले. यामुळे पूर्णा नदीपात्रात २११००.४० क्युसेसने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. या पाण्याच्या विसर्गामुळे नदीकाठच्या गावांमध्ये पूरस्थितीची शक्यता निर्माण झाली असून प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
येलदरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यातच खडकपूर्णा धरणातूनही पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने येलदरी जलाशयात जलपातळी झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून प्रथम ६ दरवाजे आणि नंतर एकूण १० दरवाजे ०.५ मीटरने उघडण्यात आले आहेत. येलदरी धरणातून मुख्य गेटद्वारे २११००.४० क्युसेस, जलविद्युत केंद्रातून २७०० क्युसेस अशाप्रकारे एकूण २३८००.४० क्युसेस विसर्ग होत आहे.
धरणातून पाण्याचा मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरू असल्याने पूर्णा नदीची पाणीपातळी झपाट्याने वाढत आहे. परिणामी, नदीकाठच्या गावांमध्ये पूरस्थिती निर्माण होण्याचा धोका आहे. प्रशासनाने या भागातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि आवश्यक असल्यास सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्याचे आवाहन केले आहे. स्थानिक आपत्ती व्यवस्थापन पथके, महसूल विभाग आणि पोलीस यंत्रणा सतर्क असून, परिस्थितीवर बारकाईने नजर ठेवण्यात येत आहे.
पूर्णा पाटबंधारे प्रकल्पाकडून मिळालेल्या माहितीनुसार, धरणात पाण्याची आवक सुरूच असल्यामुळे विसर्ग आवश्यकतेनुसार कमी किंवा जास्त करण्यात येईल. परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील निर्णय घेतले जातील. असे कळविले आहे. स्थानिक प्रशासन व पाटबंधारे विभागाने नागरिकांना नदीपात्रात जाणे टाळावे, अफवांवर विश्वास न ठेवता फक्त अधिकृत सूचनांवर विश्वास ठेवण्याचे आवाहन केले. कोणतीही आपत्कालीन घटना घडल्यास तत्काळ प्रशासनाशी संपर्क साधावा असे आवाहन केले आहे.