

परभणी: शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर महाराष्ट्र शासनाने उत्तर प्रदेश सरकारच्या धर्तीवर पुनर्विचार याचिका दाखल न केल्याने राज्यातील शिक्षकवर्गामध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. या निषेधार्थ रविवारी (दि.९) महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक मध्यवर्ती संघटना, शाखा जिल्हा परभणी यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढण्यात येणार आहे.
या मोर्चाची सुरुवात महात्मा फुले पुतळा परिसरातून होऊन तो जिल्हाधिकारी कार्यालय येथे धडकणार आहे. राज्यातील शिक्षक संघटनांनी यापूर्वी १ ऑक्टोबर रोजी नागपूर येथे झालेल्या बैठकीत शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्याशी चर्चा करून शासन लवकरच सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करेल, अशी ग्वाही मिळाल्याने ४ ऑक्टोबर रोजी नियोजित मूक मोर्चा स्थगित केला होता. मात्र, शासनाने ठरलेल्या मुदतीत पुनर्विचार याचिका दाखल न केल्याने शिक्षकवर्गामध्ये संतापाची लाट उसळली आहे.
मूक मोर्चातून टीईटी संदर्भात तातडीने सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करावी, दि.१५ मार्च २०२४ चा सुधारित संचमान्यता शासन निर्णय रद्द करावा, जुनी पेन्शन योजना लागू करावी, सर्व ऑनलाइन कामे रद्द करावीत, विषय शिक्षकांना पदवीधर वेतनश्रेणी लागू करावी, शिक्षणसेवक योजना रद्द करावी, वस्तीशाळा शिक्षकांची मुळ सेवा सेवा कालावधीसाठी ग्राह्य धरावी अशा प्रमुख मागण्या मानल्या जाणार आहेत. संघटनेच्या नेत्यांनी सांगितले की, राज्य शासनाने शिक्षकांच्या भावना लक्षात घेऊन तातडीने सकारात्मक निर्णय घेतला नाही, तर पुढील काळात आंदोलन तीव्र केले जाईल. निवेदनावर महाराष्ट्राचे प्राथमिक शिक्षक मध्यवर्ती संघटनेचे राज्य अध्यक्ष केशवराव जाधव, राज्य सरचिटणीस राजेश सुर्वे, सतीश कांबळे, युवराज अंबोरे यांच्यासह आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.