

Somnath Suryawanshi Death Case
सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिलेला आदेश कायम ठेवला आहे. सूर्यवंशी यांच्या मृत्यू प्रकरणी दोषी असलेले पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले होते. हा आदेश सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवला असल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी X वर पोस्ट करत दिली आहे. हा राज्य सरकारसाठी धक्का मानला जात आहे.
परभणीत सहा महिन्यांपूर्वी संविधानाच्या प्रतिकृतीच्या विटंबनेनंतर मोठा हिंसाचार झाला होता. या हिंसाचारात पोलिसांच्या लाठीमारात आणि त्यानंतर कोठडीत पोलिसांनी केलेल्या मारहाणीत सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला होता.
सर्वोच्च न्यायालयाने आमच्या बाजूने निकाल दिला आहे. महाराष्ट्र राज्य आणि इतर विरुद्ध विजयाबाई व्यंकट सूर्यवंशी या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा आदेश कायम ठेवला आहे, असे आंबेडकर यांनी म्हटले आहे.
सोमनाथ यांचा मृत्यू कोठडीत, राज्य सरकारच्या अखत्यारीत असताना झाला. आम्ही न्यायालयाला ही बाब लक्षात आणून दिली. न्यायालयाने एका आठवड्यात एफआयआर दाखल करा, असे सांगितलं होते. पण तो अद्याप दाखल केला नाही. आता न्यायालयाचा अवमान केला आहे हे सिद्ध झालंय, असे आंबेडकर म्हणाले.
या खटल्यात राज्य सरकार आरोपी आहे. सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू राज्य सरकारच्या ताब्यात असताना झाला आहे. सरकारने हात झटकून घेण्याचे काम केले. आम्ही हे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्याचे प्रकाश आंबेडकर पुढे म्हणाले.
१० डिसेंबर २०२४ रोजी परभणीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात असलेल्या संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना केल्याची घटना घडली होती. यानंतर ११ डिसेंबर रोजी परभणी बंदची हाक देण्यात आली होती. संविधान प्रतिकृतीच्या विटंबनेनंतर शहरात तणाव निर्माण झाला होता.
१५ डिसेंबर रोजी पोलिसांच्या लाठीमारात सोमनाथ सूर्यवंशी गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर त्यांचा पोलिस कोठडीत मृत्यू झाला होता. या प्रकरणी १८ डिसेंबर २०२४ रोजी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आई विजयाबाई व्यंकट सूर्यवंशी यांनी परभणीतील नवा मोंढा पोलिस ठाण्यात माझ्या मुलाचा मृत्यू हा पोलिसांच्या मारहाणीतच झाल्याची तक्रार दिली होती.
या प्रकरणी विजयाबाई सूर्यवंशी यांनी ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्यामार्फत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली. सोमनाथ मृत्यूप्रकरणी दोषी असलेल्या पोलिस अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी याचिकेतून केली.
या प्रकरणाची सुनावणी न्यायाधीश विभा कंकनवडी, विजय देशमुख यांच्या पॅनलसमोर झाली. या प्रकरणी न्यायाधीश कंकनवडी यांनी दोषी पोलिस अधिकाऱ्यांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.